विराट, केदारच्या धमाक्याने डोंगर पार

0

-सहाव्या विकेटसाठी केली विक्रमी भागीदारी; खराब सुरूवातीनंतर सावरला डाव
-दोघांच्या दणदणीत शतकांच्या बळावर इंग्लंडने दिलेले ३५१ धावांचे लक्ष्य केले पूर्ण

पुणे: खराब सुरूवातीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पुण्याच्या केदार जाधवने ठोकलेल्या जबरदस्त शतकांच्या बळावर इंग्लंडच्या ३५१ धावांचा डोंगर पार केला. इंग्लंडच्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाल्यानंतर दोघांनी सहाव्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी करून भारताला विजयाचा मार्ग सुकर करून दिला. विराट कोहलीने आपला दमदार फॉर्म कायम ठेवीत ५ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०५ चेंडूत १२२ तर केदारने केवळ ७६ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२० धावांची खेळी केली. विजयाला ६० धावा हव्या असताना केदार बाद झाला. दोघे बाद झाल्यानंतर यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. मात्र जडेजा (१३) धावांवर बाद झाल्याने संघ पुन्हा अडचणीत आला. मात्र यांनतर आलेल्या आर. आश्विन सोबत हार्दिक पंड्याने शानदार ४० धावांची खेळी करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. रोमांचक झालेल्या या सामन्यात अश्विनने षटकार खेचत इंग्लंडवर ३ गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर टीम इंडियाने ११ चेंडू राखत बाजी मारली. इंग्लंडकडून जैक बेलने ३, विली आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पुणेकर केदारने केले सोने
कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात पुण्याच्या केदार जाधवला संधी दिली. केदारने आपल्या घरच्या मैदानावर कप्तानाचा निर्णय सार्थ ठरविताना संधीचे सोने केले. संघ हारण्याच्या स्थितीत असताना त्याने केवेल कर्णधाराला साथ दिली नाही तर जबरदस्त स्ट्राईक रेटने खेळत विराट कोहलीवरचा दबाव कमी केला. केदारने आपले दुसरे शतक केवळ ६५ चेंडूत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. विराट कोहलीसोबत विक्रमी दोनशे धावांची भागीदारी रचत केदारने टीम इंडियाचा विजय सोपा केला. केदारने आपल्या जबरदस्त खेळीत विशेष म्हणजे एकही चूक केली नाही. त्याच्या सफाईदार खेळीने टीम इंडियाला मोठ्या धावांचा पाठलाग करण्यात यश मिळाले. तो नव्वदीत खेळत असताना त्याच्या पायाला हलकीशी दुखापत झाली असताना देखील त्याने जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला विजयश्री प्राप्त करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. विजयाला ६० धावा बाकी असताना तो बाद झाला.

इंग्लंड संघाने उभारला डोंगर
सलामीवीर जेसन रॉयने दिलेली दमदार सुरूवात, जो रुटची ७३ धावांची आश्वासक खेळी आणि बेन स्टोक्सची ४० चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी ३५१ धावांचे खडतर आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या जेसन रॉयने सुरूवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत चांगली सुरूवात करून दिली. बुमराहच्या डायरेक्ट हीटवर इंग्लंडची सलामीची जोडी सातव्या षटकात फुटली. बुमराहच्या अचूक थ्रोवर अॅलेक्स हेल्स धावचीत झाला. जेसन रॉयला मात्र यावेळी चांगला सुर गवसला. रॉयने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मग सामन्याच्या १९ व्या षटकात रवींद्र जडेजाने भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. जडेजाच्या फिरकीवर धोनीने अफलातून स्टम्पिंग घेत घातक जेसन रॉयला ७३ धावांवर बाद केले. त्यानंतर जो रुट आणि मॉर्गन यांनी संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला आणि धावसंख्येला चांगला आकार देण्यास सुरूवात केली.

हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर मॉर्गन यष्टीरक्षक धोनीकरवी झेलबाद झाला. जो रुटने दुसऱया बाजूने फटकेबाजी सुरू ठेवून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील आपले १८ वे अर्धशतक ठोकले. अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात जो रुट बुमराहच्या गोलंदाजीवर ७८ धावांवर, तर जोस बटलर ३१ धावांवर झेलबाद झाला. बटलर आणि जो रुट यांनी चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यानंतर स्टोक्सने ४० चेंडूत ६२ धावांची खेळी साकारून संघाला ३०० टप्पा गाठून दिला. स्टोक्सने सामन्यात तब्बल पाच खणखणीत षटकार ठोकले. अखेरीस मोईन अलीने आपल्या २८ धावांची भर घातली आणि इंग्लंडने ५० षटकांच्या अखेरीस ३५० चा आकडा गाठला. भारतीय संघाकडून हार्दिक पंड्या आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर जडेजा आणि यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली. आर.अश्विन यावेळी सपशेल अपयशी ठरला.

पुण्यातील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन
सामन्याचा नाणेफेक भारतीय संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हा सामना पाहण्यासाठी पुण्यात गहुंजे स्टेडीयमवर खचाखच गर्दी झाली होती. आणि इथे होत असलेल्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. गहुंजेच्या मैदानावर सामन्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. सामन्यात इंग्लंडच्या धावांच्या डोंगर आणि भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले. त्यात युवराज आणि धोनी लवकरच बाद झाल्याने दर्शकांची निराशा झाली होती. मात्र धाकड कर्णधार विराट आणि मराठमोळ्या केदार जाधवने प्रेक्षकांना अक्षरशा नाचायला भाग पाडले.

टीम इंडियाची खराब सुरुवात
इंग्लंडच्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात म्हणावी तशी समाधानकारक झाली नाही. पहिल्या वनडेत इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 351 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव अडखळला आहे. शिखर धवन (1), लोकेश राहुल (8), युवराज सिंग (15) आणि महेंद्र सिंग धोनी (6) हे खंदे फलंदाज झटपट माघारी परतल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती. मुंबईत झालेल्या सराव सामन्यात जबरदस्त वापसी करणाऱ्या युवराज आणि धोनीकडून सपशेल निराशा झाली. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातून अजिंक्य रहाणेला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर महाराष्ट्राचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी देण्यात आली. त्याने संधीचे सोने केले.