नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका शितपेयाच्या कंपनीनेने दिलेला 20 कोटी रुपयांच्या कराराचा प्रस्ताव नाकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने कुठलेही शितपेय पित नाही. त्यामुळे त्याने या प्रस्तावाबाबत स्वारस्य दाखवलेले नाही. कोहली म्हणाला की, फिटनेसच्या बाबतीत मी खूप आग्रही आहे. त्यामुळे केवळ पैसे मिळणार आहेत म्हणुन लोकांना शितपेय प्या असे कसे सांगणार. कोहली म्हणाला की, ज्या वस्तू मी वापरतो त्याच उत्पादनांची जाहिरात करतो. माझ्या सरावसत्रात शितपेयांसाठी जागा नाही. स्वत:ला फिट राखण्यासाठी अथक मेहनत करतो. स्वत: विराट फ्रान्सवरून येणारे पाणी पितो आणि जंक फुड तो अजिबात खात नाही. साखर आणि कार्बोेनेटेड पदार्थांचे सेवन केल्याने शरीरावर घातक परिणाम होत असल्याची सोशल मिडीयावर सुरू असलेल्याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर विराटने हा निर्णय घेतला आहे. 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव नाकारून विराटने इतर गोष्टींपेक्शा फिटनेस महत्वाचा असल्याचा हे दाखवून दिले आहे.
याआधीही भारतीय खेळाडूंनी शितपेयांच्या जाहिरातींचे प्रस्ताव नाकारले आहेत. कोहलीच्याआधी 2001 मध्ये माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि मुख्य राष्ट्रीय मार्गदर्शक पुलेला गोपीचंद यांनी शितपेयाची जाहिरात करण्यास नकार दिला होता. 2001 साली गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकल्यावर त्यांच्याकडे अशा जाहिरातींचे प्रस्ताव आले होते. त्यावेळी अशा प्रस्तावांना नकार देताना गोपीचंद म्हणाले की, मी योगाभ्यास, ध्यान आणि मर्यादित जेवणाचे वेळापत्रक पाळतो. शितपेय न पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शितपेयाची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. मोठी रक्कम मिळणार म्हणुन इतरांना शितपेय पिण्याचा सल्ला देणार नाही.