मुंबई । श्रीलंकेविरोधात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 ची आघाडी घेत मालिकेवर वर्चस्व मिळवले आहे. चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे भारताने धावांचा डोंगर उभा केला होता. दोघांनी 219 धावांची भागीदारी श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने हातात माईक घेत विराट कोहलीची मुलाखत घेऊन टाकली. यावेळी गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघ कशाप्रकारे बलाढ्य संघ म्हणून उदयास आला यावर चर्चा करण्यात आली. या मुलाखतीत सर्वात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे विराट कोहलीने सपोर्ट स्टाफचे आभार प्रदर्शन करताना कुठेही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचा साधा उल्लेखही केला नाही.
यावेळी विराट कोहलीने एकदाही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचा उल्लेख केला नाही. विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदातील जास्त काळ कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली घालवला आहे. अनिल कुंबळे प्रशिक्षक होते तेव्हाच भारताने 2016-17 मध्ये घरच्या मैदानावर कसोटीमध्ये मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे विराट कोहलीने आपल्यातील वाद विसरून अनिल कुंबळेंचेही आभार मानायला तशी काहीच हरकत नव्हती.