‘विराट’ वादळ सुरूच..!

0

नवी दिल्ली । फिरोझशहा कोटला मैदानात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर श्रीलंकेचा संघर्ष सुरू आहे. कर्णधार विराट कोहलीचे शतक (243) आणि सलामीला आलेल्या मुरली विजयच्या शतकाच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला. विराट आणि विजयसह रोहित शर्मानेही 65 धावांची उपयुक्त खेळी केली. भारताच्या मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने तीन विकेट्स गमावून 131 धावा केल्या होत्या. अँजोलो मॅथ्यूज 57 धावा आणि कर्णधार दिनेश चंडिमल 25 धावांवर खेळत होते. रविवारी भारताने पहिल्या दिवसाच्या 4 बाद 371 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव राहिला. दरम्यान, विराटने आपले कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक पूर्ण केले, तर रोहितनेही अर्धशतकाला गवसणी घातली. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी करत संघाला 500 धावांचा टप्पा ओलांडून दिला. उपाहाराला काही वेळ असतानाच रोहित 65 धावा काढून बाद झाला. उपाहारानंतर विराट कोहली त्रिशतकी मजल मारणार अशी अपेक्षा होती. मात्र, ऐन मध्यान्ही मैदानात आलेले धुरके आणि त्याचे निमित्त करून श्रीलंकन खेळाडूंनी खेळास चालढकल करण्यास केलेली सुरुवात यामुळे विराटची लय बिघडली. त्यातच अश्‍विन आणि विराट (243) पाठोपाठ बाद झाले. अखेरीच विराटने भारताचा डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला.प्रदूषणामुळे दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेला भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. मात्र, खेळ पूर्णपणे थांबवण्यास पंचांनी नकार दिला. त्यामुळे प्रदूषणाने त्रस्त झालेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना मास्क लावून खेळावे लागले.

स्वत:चाच विक्रम मोडला
विराट कोहलीने दिल्ली कसोटीत द्विशतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सर्वाधिक द्विशतक ठोकणारा तो एकमेव कर्णधार बनला आहेच. शिवाय कर्णधार या नात्याने सर्वोच्च धावसंख्या उभारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. याअगोदरही हा विक्रम त्याच्याच नावावर होता. 2016 साली विराटने 235 धावा केल्या होत्या. कर्णधार असताना एवढी धावसंख्या उभारणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार होता. त्याच्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने 2013 साली 224 धावा केल्या होत्या. कर्णधार असताना सचिन तेंडुलकरनेही 1999 साली 217 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या उभारणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने स्वतःच्याच 235 धावांचा विक्रम मोडीत काढला. दिल्ली कसोटीत विराटने 243 धावा केल्या.

श्रीलंकन खेळाडूंची पळवाट
श्रीलंकेचे खेळाडू धुराचे कारण पुढे करून सतत खेळ थांबवत होते. श्रीलंकेचे गोलंदाज लाहिरू गमागे आणि सुरंगा लकमल यांनी श्‍वास घ्यायला त्रास होतोय, हे कारण पुढे करत मैदानाबाहेर गेले. हळूहळू श्रीलंकेकडे फिल्डरची संख्या कमी झाल्याने भारताला खेळ घोषित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. श्रीलंकन खेळाडूंचा हा प्रकार पाहून कोहलीदेखील भडकला होता.

सर्वाधिक द्विशतके
विराट कोहलीने दिल्लीत सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतले सलग दुसरे, यंदाच्या वर्षातले तिसरे तर कसोटी कारकीर्दीतले एकूण सहावे द्विशतक ठरले. सर्वाधिक द्विशतक झळकावणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट आता सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसोबत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कर्णधार या नात्याने सर्वाधिक द्विशतक ठोकणारा विराट जगातला पहिला फलंदाज ठरला. त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला. कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या नावावर पाच, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन, ग्रॅमी स्मिथ आणि मायकल क्लार्कच्या यांच्या नावावर प्रत्येकी चार द्विशतके आहेत.