विरारमध्ये रुग्णवाहिका पावसाळ्यात कुचकामी

0

विरार : शासनाने 108 या दूरभाष सेवेमार्फत रुग्णांना त्वरित उपचार मिळावा या बहुउद्धेशिय भावनेने सुरू केलेली रुग्ण वाहिका सेवा ऐन पावसाळ्यात व्यस्त असल्याने कुचकामी ठरत आहे. त्यामुळे वसई तालुक्यातील विरार पूर्व दुर्गम ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना अत्यावश्यक उपचार मिळवण्यासाठी इतर रुग्णवाहिका सेवा किंवा खाजगी वाहनाने दवाखान्यात पोहचावे लागत आहे. दिनांक 27 जुलै रोजी खानिवडे गावातील नाक्यावर संध्याकाळी 4 च्या सुमारास श्याम नावाचा आदिवासी पाड्यावर राहणारा तरुण वेदनेने विव्हळत फिरत होता. यावेळी गावातील तरुणांनी श्यामला त्वरित उपचार मिळावेत म्हणून 108 रुग्णवाहिका सेवेला कॉल केला. घटनेचे लोकेशन जाणून घेऊन आपले नाव न सांगणार्याव व कॉल रिसिव्ह केलेल्या इसमाने मांडवी येथील सर्वात जास्त जवळ असलेली रुग्ण वाहिका नादुरुस्त असल्याचे सांगून विक्रमगड किंवा वसई येथून येईल असे सांगितले.

वसई तालुक्यासाठी सातही रुग्णवाहिका व्यस्त
दुसर्‍याच दिवशी म्हणजेच 28 जुलै रोजी मेढा गावच्या दुर्गम असलेल्या प्लॉट पाडा येथील गरोदर महिला वंदना संतोष पागी हिला प्रसूती वेदना होत असल्याने दुपारी 1 च्या सुमारास ही 108 रुग्णवाहिका सेवेला कॉल केला मात्र रुग्णवाहीका उपलब्ध न झाल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत 29 जुलै रोजी 12 वाजता 108 वर संपर्क करून दोन दिवसांच्या घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, संपूर्ण वसई तालुक्यासाठी सात रुग्णवाहिका असून दिनांक 28 रोजी अगोदरच्या कॉल प्रमाणे 5 रुग्णवाहिका सेलवास येथे 2 मुंबईतील नायर येथे तर एक जेजे व एक इतर रुग्णालयात पेशंट घेऊन गेल्याने दुसरीकडील रुग्णवाहिकैची तजवीज करताना उशीर झाल्याचे सांगितले.