‘विरासत’मधून उलगडली दिग्गज गायकांची स्वरपरंपरा

0

पुणे : ‘हसले मनी चांदणे…’ या पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतापासून ते अगदी ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या ‘जाळीमंदी पिकली करवंद…’ या ‘पुढचं पाऊल’ चित्रपटातील ठसकेबाज लावणीसोबतच विविध अभंग, भावगीते आणि शास्त्रीय संगीताच्या विविध छटा रसिकांनी याची देही याची डोळा अनुभविल्या. पं. भास्करबुवा बखले आणि भारत गायन समाज यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दिग्गज गायकांच्या गायिकीचा सुरेल प्रवास ‘विरासत’ या स्वरपरंपरा सांगणार्‍या अनोख्या कार्यक्रमातून उलगडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘विरासत-एक परंपरा’ हा कार्यक्रम प्रख्यात गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांनी सादर केला.

शास्त्रीय संगीताचा वारसा जपणार्‍या दोन स्वरपणत्यांनी हा अमूल्य खजिना रसिकांसमोर उलगडत असताना भूप रागातील रचनांनी सुरुवात केली. त्यानंतर ‘संगीत स्वयंवर’ या नाटकातील ‘गरजत आये’ आणि ‘अर्नुतची गोपाला’ ही पदे सादर केली. भास्करबुवांच्या चालींनी कल्पकतेचा कळस गाठला होता, त्या काळातील छोटा गंधर्व यांनी गायलेला ‘बोल ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले…’ या अभंगाच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यासोबतच संगीतकार बाळासाहेब माटे यांनी संगीतबद्ध केलेली ‘कुणीतरी सांगा गे, कृष्ण देखीला बाई माझा, कृष्ण देखीला…’ या गवळणीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

आग्रा घराण्याची पं. राम मराठे यांची सोहोनी रागातील ‘काहे अब तुम आये’ आणि ‘देखी एक चतुरनार’ या बंदीशी रसिकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. तर, या सादरीकरणादरम्यान झालेली तबला आणि पखवाज यांची सुरेल जुगलबंदी उपस्थितांनी अनुभविली.