विरोधकांकडून विकासकामांमध्ये अडथळा ; शहर बकाल करण्याचा प्रयत्न

0

भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे मांडले गर्‍हाणे ; अमृत योजनेच्या पाहणीचे निमंत्रण

भुसावळ- भुसावळ शहराच्या विकासासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना व आगामी 50 वर्षांचे नियोजन करून शहरात अमृत योजनेच्या कामाला गती आली असतानाच विरोधकांकडून खोटे-नाटे आरोप करून कामांमध्ये अडथळा आणून शहर बकाल करण्याचा कुटील डाव सुरू असल्याने खोट्या तक्रारींना थारा देऊ नये, अशी मागणी मागणी भाजपाच्या शिष्ट मंडळाने आमदार संजय सावकारे व भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सोमवारी केली. याप्रसंगी खोट्या-नाट्या तक्रारींना आमच्याकडून थारा दिला जाणार नाही, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याचे नगराध्यक्ष भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. जिल्हाधिकार्‍यांनी भुसावळातील अमृत योजनेच्या पाहणीचे प्रसंगी निमंत्रण देण्यात आले असून लवकरच ते शहराला भेट देवून कामांची पाहणी करणार आहेत.

विरोधकांकडून शहर बकाल करण्याचा प्रयत्न
दिड वर्षांपासून भाजपाची पालिकेवर सत्ता आली असून आम्ही एकीकडे शहर विकासाच्या विषयांना मंजुरी देत असताना विरोधक मात्र खोटे-नाटे आरोप करून पालिकेच्या सभा रद्द करण्याची मागणी करीत असल्याचा प्रकार हास्यास्पद आहे. विरोधकांना शहर बकाल करावयाचे असून त्याचा ठपका आमच्या माथी मारून राजकारण करावयाचे असल्याचे प्रसंगी सांगण्यात आले. नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा डिजिटल व्हाव्यात म्हणून आमचा प्रयत्न आहे व आगामी शैक्षणिक वर्षापासून त्याबाबत आम्ही आग्रही असल्याचे नगराध्यक्षांनी प्रसंगी सांगितले. अमृत योजनेसाठी तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर मंजुरी मिळाली, सचिव स्तरावर तीन ते चार वेळा बैठका घेण्यात आल्या, सर्व परवानग्या मिळाल्यानंतर कामाला सुरुवात झाली आता मात्र विरोधक या योजनेत अडथळा आणून काम बंद पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचे आमदार व नगराध्यक्षांनी प्रसंगी सांगितले. याप्रसंगी रेल्वे परीसरातील झोपडपट्टी धारकांविषयी शासनाने भूमिका घेऊन मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रिपाइंचे राजू सूर्यवंशी यांनी केली.

यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवा वाणी, बापू महाजन, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र आवटे, वसंत पाटील, मुकेश पाटील, रिपाइंचे गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.