सावदा । पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेदरम्यान मागील इतिवृत्त कायम करतांना विरोधी सदस्यांनी विषयाला सोडून चर्चा सुरु केली. प्रश्नोत्तरासंबंधी सभा संपल्यावर वेळ देवून चर्चा करता येईल, असे वारंवार सांगूनही सदस्यांनी ऐकले नाही. उलट कांगावा करीत त्यांनी सभात्याग केला. हा विरोधकांचा पुर्वनियोजित बनाव असल्याचे नगराध्यक्षा अनिता येवले यांनी सांगितले.
महिला सदस्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न
पालिका सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाविषयी खुलासा देतांना नगराध्यक्षा येवले यांनी सांगितले की, शहरात घरोघर फिरुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. त्या समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. यात जनतेची सेवा करणे हाच उद्देश आहे. मात्र यातही काही जणांना राजकारण दिसत असल्याची टीका येवले यांनी केली आहे. सभागृहात सत्ताधारी महिला सदस्यांची संख्या जास्त आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांसह सर्व समित्यांच्या सभापतीसुध्दा महिला आहे. संविधानाने महिलांना हा अधिकार दिल्यामुळे शहरात महिला सत्तेत सहभागी आहे व इतर ठिकाणीही सहभागी होत आहे. सर्व महिला सदस्या प्रथमच निवडून आलेल्या असून निर्भयपणे आणि सक्षमपणे काम करीत आहे. हे काहींना खटकत असल्याचे जाणवते. महिला पदाधिकार्यांना कामकाज करता येवू नये म्हणून सभागृहात आरडाओरड करण्याच्या घटना होत आहे. त्यामुळे विरोधी सदस्यांनी संविधानिक जबाबदारीचे भान ठेवून कामकाजात सहकार्य करावे, अशी अपेक्षा येवले यांनी व्यक्त केली आहे.