भुसावळ। स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेले सर्वेक्षण हे डिसेंबर- जानेवारी दरम्यान करण्यात आले. या काळात पालिकेत नुकतेच सत्तांतर झाले होते. मात्र काम करण्यास पुरेसा कालावधीच मिळू शकला नाही. मागील बॉडीस 25 दिवस, यानंतर पदवीधर मतदार संघ आणि जिल्हा परिषद निवडणूका यात पालिकेचे कर्मचारी कामाला लागले होते. त्यानंतर मुख्याधिकार्यांच्या प्रकृती अवस्थामुळे ते सुटीवर गेले. त्यामुळे आमच्याकडे केवळ दीडशे दिवसांचा कालावधी मिळाला होता. त्यामुळे शासकीय नियमांमुळे विकास कामांना उशिर होत असतो. यातही पहाटे 5 वाजेपासून शहरात हागणदारीमुक्तीसाठी फिरुन जनजागृती केली. संबंधितांवर कारवाई केली. मात्र शहरात आजपर्यंत ज्यांची सत्ता होती त्यांनी काय कामे केलीत त्याचेच फळ म्हणजे देशातील अस्वच्छ शहरांमध्ये भुसावळचा दुसरा क्रमांक लागला. आणि आता स्वत:च आंदोलन करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असून विरोधकांची करतूद म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे या उक्तीप्रमाणे असल्याचे सांगत नगराध्यक्ष रमण भोळे यांनी विरोधी जनाधार पार्टीवर पलटवार केला.
तत्कालीन सत्ताधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळेच शहर अस्वच्छ क्रमवारीत
याप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेली, किरण कोलते, रमेश मकासरे, मुकेश पाटील, मुकेश गुंजाळ, महेंद्रसिंग ठाकूर, वसंत पाटील, राजेंद्र आवटे आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष भोळे म्हणाले की, सर्वेक्षणाचे निकष पाहिले असता वर्षानुवर्षे मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाले आहे. नागरि सुविधांबाबत तत्कालीन सत्ताधार्यांची बेफिकीर वृत्ती यामुळे नागरि सुविधा, सार्वजनिक शौचालय, कचरा संकलन, घंटागाडी तरतूद करणे, कचरा पेटी, सफाई कामगार यासह कामगारांचे साहित्यय नसणे अशी परिस्थिती कायम आहे. या हलगर्जीपणाचा परिणाम म्हणजे शहराला स्वच्छतेच्या बाबतीत मिळालेला खालचा क्रमांक होय. शहरात स्वच्छतेच्या कुठल्याही तरतुदी नाहीत, घनकचरा व्यवस्थापना प्रकल्प गतकाळात शहरात राबविल्याचे दाखविले तेथे मात्र प्रत्यक्षात काहीच नाही याची चौकशी करुन कारवाई देखील प्रस्तावित आहे. मात्र यामुळे आमच्याकडे काम करुन दाखविण्याची संधी आली असून शहराच्या सर्वांगिण विकासासाठी फुललेली उद्याने, आरोग्याच्या सोयी, सांडपाण्याचा निचरा, रस्ते, नियमित साफसफाई यावर भर देण्यात येणार असल्याचेही भोळे यांनी स्पष्ट केले.
वातावरण कलुषित करण्याचा डाव
पालिकेतील विरोधकांना स्वत:ची शरम राहिली नाही. एकीकडे विकास कामांना विरोध केला जातो तर दुसरीकडे कामे होत नसल्याची ओरड केली जाते. अशी नौटंकी सध्या सुरु असून शहरातील वातावरण कलुषित करण्याचा विरोधकांचा डाव आहे आणि तो आम्ही हाणून पाडू असे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सांगितले.
विकासकामांमध्ये अडथळा आणण्याचा विरोधकांचा हेतू
पालिकेच्या सभेत 13 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. यात शहरातील प्रभाग 1 ते 24 यांचा समावेश असून सर्व भागांना न्याय दिला आहे. मात्र विरोधक हि सभाच रद्द करण्याची मागणी करीत असून एकप्रकारे विकासात अडथळे आणले जात आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई होती मात्र यावर्षी पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेवर विशेष लक्ष देऊन तसेच पुरेसा जलसाठा केल्यामुळे टँकर पासून मुक्ती मिळाली आहे. मात्र विरोधक मुख्याधिकार्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी खोटे अर्ज दाखल करीत आहेत. यात केवळ कामे होऊ नये हा विरोधकांचा हेतू असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
जनाधारने केला निषेध
केंद्र शासनातर्फे देशातील 434 शहरांमध्ये सर्वेक्षण केले. यात भुसावळ शहर हे अस्वच्छतेच्या बाबतीत दुसरे आले आहे. त्यामुळे पालिकेतील विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्याला वंदन करून मुख्य चौकात नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी.टी. ़बाविस्कर यांच्या प्रतिमेला चपला-बुटांचा हार घालून निषेध व्यक्त केला़ तसेच मुख्याधिकार्यांना हटविण्याची मागणी करण्यात आली़. त्यामुळे पालिकेच्या पहिल्या सभेत उद्भवलेल्या वादानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा शहरातील समस्यांप्रश्नी मुख्याधिकार्यांवर खापर फोडून त्यांना हटविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आंदोलनात गटनेते उल्हास पगारे, पिआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, अॅड. तुषार पाटील, दुर्गेश ठाकूर, नितीन धांडे, राहुल बोरसे, सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.