मुंबई – केंद्रातल्या सरकारच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार रामनाथ कोविंद यांना विरोधकांची किमान ११ मते मिळवून देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यशस्वी झाले. भाजपाच्या या खेळीमुळे कोणत्याही परिस्थितीत फडणवीस यांचे सरकार आपल्यावर अवलंबून नाही याची जाणीव सरकारमध्ये राहून सरकारवर कायम टीका करणाऱ्या शिवसेनेलाही झाली आहे.
राज्यात २८८ विधानसभा सदस्य आहेत. यातील बहुजन विकास आघाडीचे सदस्य क्षितीज ठाकूर परदेशात असल्यामुळे ते मतदानाला हजर नव्हते. उरलेल्या २८७ मतदानापैकी दोघांची मते बाद झाली. विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ पाहता तेथे भारतीय जनता पार्टीचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१, बहुजन विकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाचे अनुक्रमे तीन, एमआयएमचे दोन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी एक तर सात अपक्ष आमदार आहेत. यातील रालोआच्या उमेदवाराला भाजपाची १२२, शिवसेनेची ६३, बहुजन विकास आघाडीची दोन, सहा अपक्ष आणि रासप व मनसेचे प्रत्येकी एक अशी १९५ मतांची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्रातून २०८ आमदारांची मते मिळाली. याचा अर्थ कोविंद यांना विरोधकाची १३ मते जास्त पडली. अवैध ठरलेली दोन मते सत्ताधाऱ्यांची होती असे गृहित धरले तरी किमान ११ मते जास्त मिळविण्यात रालोआ यशस्वी झाली.
विरोधकांमध्ये काँग्रेसची ४२, राष्ट्रवादी काँग्रेसची ४१, शेकापची तीन, एमआयएमची दोन, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारिप बहुजन महासंघ, सपा आणि एक अपक्ष अशी ९२ मते होती. ती संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) उमेदवार मीरा कुमार यांना पडायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना ७७ मते पडली. याचाच अर्थ त्यांना १५ मते कमी पडली. विरोधकांची दोन मते बाद झाल्याचे गृहित धरल्यासही विरोधकांची किमान १३ मते सत्ताधाऱ्यांना मिळाली.