विरोधकांची फूट ही भाजपच्या पथ्यावर

0

इंदिरा गांधी, दिनदयाल उपाध्याय, नानाजी देशमुख, बाळासाहेब सावंत या दिवंगत नेत्यांसोबत शरद पवार आणि गणपतराव देशमुख यांच्या गौरवाचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. या ठरावामध्ये इंदिरा गांधींच्या आधी शरद पवारांचे नाव घेण्यावरून हा वाद सुरू झाला. विधानपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहाने हा निर्णय घेतला आहे. मुळात नाव अगोदर घेतल्याने शरद पवार मोठे आहेत का? याचा विचार काँग्रेसने केला पाहिजे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांची आणि पवारांची तुलना होऊच शकत नाही. शरद पवार हे महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठे नेते आहेत.

केंद्रीय पातळीवर नव्हे! दोन्ही काँग्रेसमधील भांडणाचे हे कारण असले तरी मुळात शरद पवारांची दिवसेंदिवस वाढत असलेली भाजपशी सलगी काँगे्रसला पटणारी नाही. शेतकरी संप मिरवण्यासाठी शरद पवारांनी केलेली मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विसरू शकत नाहीत. शिवसेना कधी सरकारबाहेर पडले आणि आपल्याला कधी सरकारमधे शिरकाव करण्यास मिळतो, याची शरद पवार वाढ पाहत आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मिलीजुली’ काँग्रेसला पटलेली नाही. आदेश बांदेकरांची नियुक्ती अभिनेते आदेश बांदेकरांच्या नियुक्ती शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या विश्‍वस्त न्यासाच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकरांची नियुक्ती शिवसैनिकांना खटकली आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीत आपले विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे तिकीट कापून दादरमधून आदेश बांदेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते जोरदार आपटले. नंतर त्यांना शिवसेनेचे सचिव म्हणून जबाबदारी दिली. सचिव असताना या बांदेकरांनी शिवसेना घराघरांत पोहोचवली, असा भ्रम मातोश्रीवाल्यांना झाला. नुकतीच या बांदेकरांना पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी दिली होती. उरणमधे शिवसेनेचे आमदार आहेत.

पनवेल महानगरपालिकेत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. याचीच बक्षिसे म्हणून आदेश बांदेकर यांना सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद देण्यात आले. मुंबईच्या माजी महापौर, दादरच्या माजी आमदार आणि विद्यमान नगरसेविका विशाखा राऊत यांचे नाव या पदासाठी निश्‍चित झाले होते, पण आदेश बांदेकर यांची अचानक नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच धक्का दिला. आदेश बांदेकर, शरद पोंक्षे आदी अभिनेते शिवसेना चालवणार असतील, तर उद्धव ठाकरे यांचे ’अजब’ सरकार नक्कीच येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेमध्ये आहे.

बच्चू कडू यांची स्टंटबाजी
आमदार बच्चू कडू हे लोकप्रिय आमदार आहेत. त्यांच्या अचलपूर मतदारसंघात ते त्यांच्या मतदारांच्या गळ्यातील ताईत आहेत. इथपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या आयएएस अधिकार्‍यावर हात उचलणे नक्कीच शोभादायक नाही. नाशिकच्या आयुक्तांनी काही त्यांचे ऐकले नसेल तर त्यासाठी अन्य मार्ग आहेत. विधीमंडळ अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत या अधिकार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी अनेक आयुधे आहेत. त्याचा वापर न करता एखाद्या अधिकार्‍यावर हात उचलणे योग्य नाही. लोकप्रतिनिधी व प्रशासन ही एका गाडीची चाके आहेत. एक चाक बिघडले तर राज्याचा गाडा चालणार नाही. आता आयएएस अधिकार्‍यांनी ठराव केला की बच्चू कडू यांना आपल्या कॅबिनमध्येच घ्यायचे नाही, त्यांची कामे कायद्याच्या चौकटीत बसून करायची, तर बच्चू कडू कुणाकडे न्याय मागणार? सर्वच आयएएस अधिकार्‍यांवर हात उगारणार का?
नितीन सावंत – 9892514124