विरोधकांची महारॅली ही जनतेच्या विरोधातली – नरेंद्र मोदी

0

सिल्वासा : पश्चिम बंगालमध्ये उभी राहिलेली विरोधकांची महारॅली ही मोदी विरोधी नाही तर जनतेच्या विरोधातली आहे. आपण पुढे जायचं, आपलं कुटुंब पुढे न्यायचं हेच यांचं उद्दीष्ट आहे. सिल्वासा या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या महारॅलीला आणि त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.

लोकशाहीची गळचेपी करणारे लोकच आज लोकशाही वाचवा अशा घोषणा देत आहेत. माझा तिरस्कार करण्यापासूनच यांचा दिवस सुरु होतो आणि मला शिव्या देत यांचा दिवस संपतो अशीही टीका मोदींनी बोलताना केली. मला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही. कारण माझा विश्वास देशातल्या सव्वाशे कोटी जनतेवर आहे. मी माझे आयुष्य त्यांच्या विकासासाठी घालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे देशातली जनता हेच माझे विश्व आहे असेही मोदींनी म्हटले आहे.

सिल्वासा या ठिकाणी एका मेडिकल कॉलेजच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार या विरोधकांना पहावत नाही त्यामुळेच अशा प्रकारे महारॅलीचे आयोज केले जाते आणि टीका केली जाते असेही मोदींनी म्हटले आहे.