विरोधकांची संख्या कमी करण्यासाठीच आमदारांचे निलंबन : नारायण राणे

0

मुंबई : राज्य सरकारला विधिमंडळाचे अधिवेशन चालवायचे नाही. हे राज्य दीवाळखोरीकडे चालले आहे. विरोधकांशी चर्चा करणे सरकारचे काम आहे. कर्जमाफीची मागणी करणारे 19 आमदार निलंबित होतात. पाच-सहा ठीक आहे. विरोधकांची संख्या कमी करण्यासाठी केलेले हे कृत्य आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुरूवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.

निलंबित करण्यात येणाऱ्या आमदारांमध्ये नितेशचे नाव होते असे आपल्याला सांगण्यात आले. आपल्याला याची कल्पना नव्हती. आपल्याला याचे काही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते आंदोलन होते. त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या सरकारला अर्थसंकल्प नीट मांडता आला नाही. त्यात आर्थिक निकष डावलले गेले आहेत. विरोधकांना घाबरून सरकारने हे निलंबन केले आहे. त्यामुले सरकारची पात्रता राज्याला कळली आहे. महागाई वाढली आहे. अच्छे दिन सांगण्याऱ्यांनी रेल्वे पल्टफॉर्म तिकीट वाढवले आहे. सरकार महागाई, शेतकऱ्यांची आत्महत्त्या यावर काही बोलत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जमीन अजून ताब्यात आलेली नाही. शिवसेनेचे तर तळ्यात मळ्यात सुरू आहे. आधी भेटतात. मग बाहेर आंदोलन करतात. शिवसेनेचे मंत्री मंत्रीपद टिकवण्यासाठी लाचार झाले आहेत, असेही राणे म्हणाले.

राज्यात काँग्रेसला सगळीकडे अपयश असले तरी सिंधुदूर्गमध्ये यश मिळाले आहे. आपण काँग्रेसमध्ये नाराज नाही तर काँग्रेसमधल्या ठराविक लोकांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अभद्र युती झाली. पक्षांमध्ये निष्ठा राहिली नाही. आप्तांसाठी काहीही केले जात आहे. हा वैयक्तिक स्वार्थ आहे. समाजासाठी हे योग्य नाही, असेही राणे म्हणाले.

आपण काँग्रेसमध्येच
आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि काँग्रेसमध्येच राहणार आहोत. आपण काँग्रेस सोडून शिवसेना वा भारतीय जनता पार्टीत जात असल्याची आवई आमच्या पक्षातलेच काही हितशत्रू पसरवत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुरूवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आपण संघर्ष करत आलो आहोत. आपण काँग्रेसमध्ये गेल्यापासून काँग्रेसची काही मंडळी आपल्या कुटुंबियांना डावलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही अफवा पसरवण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला नागपूरला जायचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेथे जाणार होते. आपल्या सहाय्यकांनी त्यांना विनंती केली व त्यांनी ती मान्यही केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या विमानातून नागपूरपर्यंत गेलो होतो. विमानात अनेक जण होते. अशावेळी काय पक्ष सोडण्याच्या वा पक्षप्रवेशाच्या गोष्टी होतात का, असा सवाल त्यांनी केला. भूकंप सांगून येत नाही. अचानक येतो, हे सांगायलाही राणे विसरले नाहीत.