विरोधकांची संघर्षयात्रा सुरू!

0

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांनी दोन्ही सभागृहात शेतकरी कर्जमाफीची मागणी केली, त्यासाठी सभागृह व सभागृहाबाहेरही आंदोलने केली, तरीही सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, त्यामुळे अखेर बुधवारपासून विरोधकांनी राज्यभर संघर्षयात्रा सुरू केली. एसी लक्झरी बसने विरोधकांनी प्रथम चंद्रपूरमध्ये आत्महत्या करणारे शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबीयांना भेटून संघर्ष यात्रेला सुरुवात केली. कर्जमाफीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल (से), समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन कवाडे, एमआयएम या सर्व विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा आयोजित केली. जनता पक्षाच्या काळात इंदिरा गांधी किंवा बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी काढलेल्या शेतकरी यात्रेच्या धर्तीवर ही संघर्षयात्रा काढण्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संघर्ष यात्रेत!
चंद्रपूरपासून विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र असा प्रवास करीत 4 एप्रिलला पनवेलमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. ही यात्रा संपेपर्यंत विरोधी आमदार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत. संघर्ष यात्रेत बडेजावपणा नसावा, असे निर्देश विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. कर्जमाफीच्या मुद्द्यावर निलंबन झालेल्या आमदारांचे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने महत्त्व वाढू नये म्हणून निलंबन मागे घेण्याची भाजपची योजना आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आदी नेतेमंडळी या संघर्षयात्रेत सहभागी आहेत. दोन वर्षांत विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे आठ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असतानाही मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफीचा विचार करू असे सांगत आहेत. ती वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आणू, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. याकरिता अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षातील नेते नागपुरातून रवाना झाले.