जळगाव । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.सोसायटी) 108 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आली. सत्ताधारी गटाने आपल्या वचननाम्यात सर्व कर्जावरील व्याजदर कमी करण्याचे जाहीर केले होते. मात्र सत्तेत येवून दोन वर्ष होवून देखील कर्जावरील व्याजदर कमी करण्यात आलेले नसल्याने विरोधकांकडून सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांना लक्ष करण्यात आले. ग.स.च्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. विरोधकांचा गोंधळ वाढल्यामुळे अवघ्या दहा मिनीटातच ही सभा गुंडाळण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ग.स.चे अध्यक्ष तुकाराम बोरले हे होते. यावेळी उपाध्यक्ष महेश पाटील, संचालक उदय पाटील, मनोज पाटील, अजबसिंग पाटील, कैलास चव्हाण, सुनील निंबा पाटील, रागिणी चव्हाण, देवेंद्र पाटील, भाईदास पाटील, अनिल पाटील, सुनील पाटील, श्यामकांत भदाणे यांच्यासह इतर संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
वार्षीक अहवालाचे सादरीकरण
सर्वसाधारण सभेत 15 विषयांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष तुकाराम बोरोले यांनी पाच मिनीटात प्रास्ताविक करत त्यामध्ये 2016-17 या वर्षामधील वार्षिक अहवाल सादर केला. तसेच सोसायटीला झालेला फायदा व सभासदांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी अवघ्या दहा मिनीटातच विविध पंधरा विषयांचे वाचन केल्यानंतर उपस्थितांनी सर्व विषय मंजुर करून घेतले.
विरोधकांनी घेतला माईक
अध्यक्षांचे प्रास्ताविक संपल्यानंतर लोकमान्य गटाचे मगन पाटील यांनी व्यासपीठावर जावून आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदय पाटील यांनी सभेनंतर बोलावे अशी विनंती केली. मात्र विरोधक आक्रमक असल्यामुळे त्यांनी माईकचा ताबा घेत सत्ताधार्यांकडे विविध मांगणी केली. मात्र मगन पाटील हे बोलत असताना माईकचा आवाज बंद केल्याने विरोधकांनी सभेत चांगलाच गोंधळ झाला. व्यासपीठावर गर्दी वाढल्यामुळे अनेकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.
राष्ट्रगानाचा अपमान
सभेला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात विरोधकांचा गोंधळ वाढल्यानंतर सत्ताधार्यांनी राष्ट्रगानाला सुरुवात करुन सभा आटोपण्याचा प्रयत्न केला. संचालक सुनील निंबा पाटील यांनी राष्ट्रगायण हे अपुर्ण गायल्याने सत्ताधार्यांनी राष्ट्रगाणाचा अपमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसेच विरोधक बोलत असताना सभा गुंडाळल्यामुळे सत्ताधार्यांना सत्तेचा माज आल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला.
नफ्याची रक्कम फसवी
2016-17 या वर्षभरात 10 कोटी 89 लाख रुपयांचा नफा दाखविला आहे. मात्र एन.पी.ए.ची 3 कोटी रुपयांची रक्कम यामध्ये समावेश केल्यामुळे यावर्षीचा नफा 10 कोटी रुपयांपर्यंत दिसत आहे. 7 कोटी रुपयांचा नफा झाला असून सत्ताधार्यांकडून दाखविण्यात आलेली नफ्याची रक्कम ही केवळ फसवेगिरी असल्याची आरोप लोकमान्य गटाचे शरद पाटील यांनी केला. सभासदांच्या भागभांडवलाची रक्कम ही 60 हजार रुपयांवरून सहकार गटाने ही रक्कम 40 हजार रुपये इतके केली आहे. ही रक्कम पून्हा 60 हजार रुपये इतकी करण्यात यावी, उधळपट्टी सुरु केली असल्याने लाभांश घटला असून, नोटाबंदी हे केवळ कारण असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
चीनी मालावर बहिष्काराची शपथ
डोगलाम सीमा प्रश्नावरुन भारत आणि चिनी यांच्यात वाद निर्माण झाल्याने परस्पर संबंध ताणले गेले आहे. चीनी वस्तुच्या विक्रीतुन मोठ्या प्रमाणात रक्कम ही चीनला जात असल्याने चीन या रकमेचा वापर दहशतवाद पोषण्यासाठी करत असल्याने चीनी वस्तुवर भारतात बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे चित्र सध्या आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी या ग.स.सोसायटीच्या सभेत सर्व शासकीय कर्मचार्यांना चीनी मालावर बहिष्कार टाकण्याची शपथ दिली.