नागपूर: नागपूर विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ केला. शेतकऱ्यांना तातडीने २५ हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. विधानसभेत भाजप-शिवसेना आमदारांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकविले. गोंधळ थांबत नसल्याने शेवटी विधानसभा अध्यक्षांनी दिवसभराचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर विधानपरिषदेत देखील तोच गोंधळ कायम राहिल्याने तेथील कामकाजही उपसभापतींनी दिवसभरासाठी तहकूब केले. विधानपरिषदेत भाजप आमदार शिमग्या प्रमाणे बोंबा मारत होते हे चुकीचे असल्याचे म्हणत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आमदारांची तक्रार पक्षाच्या गटनेत्याकडे केली जाईल असे सांगितले.
शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी चर्चेची मागणी केली. मात्र चर्चेला परवानगी देण्यात आलेली नाही. सभागृहात भाजपच्या आमदारांनी बॅनर फडकविले. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला.