आमदार रोहित पवारांची भाजपावर टीका
जळगाव: जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या जिल्ह्यात विरोधी पक्षाची एक वेगळ्या प्रकारची दडपशाही सुरू होती. त्यांच्याकडून सातत्याने प्रशासनाचा गैरवापर केला जात होता. मात्र, युवकांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यात आता परिवर्तन होत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे नाव न घेता टीका केली.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे रविवारी जिल्हा दौर्यावर आले होते. या दौर्यात त्यांनी जळगाव येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आमदार रोहित पवार म्हणाले की, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी आणि शिवसेनेलाही चांगले यश मिळाले आहे. भाजपाला केवळ 90 ते 100 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवता आली. हे सगळे युवकांमुळेच घडले आहे. जिल्ह्यातील नेते एकनाथराव खडसे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनीही या निवडणुकांमध्ये लक्ष घातले. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले आहे. सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन पुढील जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकांमध्येही युवकांनी अशीच कामगिरी करून सत्ता मिळवावी, असे आवाहन त्यांनी केले.
गट-तट विसरून एकत्र या
जिल्हा राष्ट्रवादीत असलेल्या गटातटाच्या राजकारणावरही आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, एकजूट असली तर परिवर्तन सहज शक्य आहे. यासाठी गट-तट मागे टाकून युवा वर्गासह एकत्र आले तर जिल्ह्यात 100 टक्के परीवर्तन होईल असे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाबाबत जागरूक व्हा
सोशल मीडीयात विरोधी पक्षाकडून चुकीचे संदेश पसरवले जातात. त्याला उत्तर देण्यासाठी त्याचे नीट वाचन केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. एखाद्या पत्रकाराला ताकद देऊन देशाची सुरक्षा केंद्राकडून धोक्यात आणली जात असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, असे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले.