फैजपूर । मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा मुद्दा घेत आमदार हरिभाऊ जावळे यांसह भाजपा पदाधिकार्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचे प्रसिद्धी पत्रक काढले तसेच आज झालेल्या या सभेत त्यांची अनुउपस्थिती असली तरी या सभेला पाच हजाराच्या जवळपास सभासदांनी हजेरी देवून सर्व विषयांना मंजूरी मिळून ही सभा यशस्वी झाल्याने सभेवरी बहिष्काराचा फियास्को झाला असल्याचे दिसनू आले. येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याची 43 वी सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार 10 रोजी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेवर सात विषय चर्चेला होते. यावेळी विषय पत्रिकेचे वाचन सचिव तेजेंद्र तळेले यांनी तर मागील सभेचे वृत्तांत कार्यकारी संचालक महेश सगरे यांनी वाचन केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनावणे यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील होते.
आर्थिक अडचणींवर मात करणार
कारखान्याच्या अहवाल वर्षात गाळप कमी झाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नक्त मुल्य उणे 34.55 कोटी रुपये आहेत. परंतु, काटकसरीमुळे अडचणीवर मात केली जात असून कमी उत्पादनामुळे खर्चात वाढ झाली. पगार, मजुरी, मशनरी देखभाल, वीज, पाणी पुरवठा, खर्च व्याज हे स्थिर खर्च असतात. गळीत कमी झाल्याने टनाला खर्च वाढला. लागवड हंगाम 2015-16 मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लागवडीवर परिणाम होवून सरासरी उसाच्या मिळणार्या उत्पादनावर परिणाम झाला असल्याची माहिती मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी दिली.
साखर वाटपास ब्रेक
प्रास्ताविकात चेअरमन महाजन म्हणाले की, सभासदांच्या कौटूंबिक दृष्टीने साखर वाटप हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे. मात्र, 2 वर्षापासून तांत्रिक अडचणीमुळे साखर वाटप करू शकलो नाही. त्यासाठी साखर आयुक्त व जिल्हा बँकेशी सतत संपर्क व पाठपुरवठा केला. मात्र, नक्त मुल्य उणे असून, ते वजा 34.55 कोटी आहे. म्हणून, साखर वाटप करता आली नसल्याची खंत व्यक्त केली. उस उत्पादकांना साखर मिळण्याचा आयत्या वेळचा विषयावर सभासद उस उत्पादक कर्मचारी तसेच कारखान्यावर अवलंबून असणारे इतर सर्व घटक परिसराच्या भविष्याचा विचार लक्षात घेता आधी कारखान्याचे अस्तित्व कायम राखणे महत्वाचे आहे. नंतर साखर वाटपाचा विचार करावा. असा सर्वच उपस्थित सभासदांचा सूर होता.
यांची होती उपस्थिती
सर्वसाधारण सभेस जेडीसीसी बँक संचालक राजू पाटील, हेमराज चौधरी, फैजपूर नगराध्यक्षा महानंदा होले, यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी, उल्हास चौधरी, डी.के. महाजन, भगतसिंग पाटील, पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी, माजी नगरसेवक केतन किरंगे यांसह सर्व संचालक, संचालिका आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी केले.