विरोधकांना स्वप्नातही खासदार बारणे दिसतात

0

पिंपरी-चिंचवड : खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क तसेच लोकसभेतील अव्वल कामगिरी या गोष्टींच्या बळावर ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही सहज निवडून येतील. यामुळे विरोधक चांगलेच धास्तावले असून, त्यांना स्वप्नातही खासदार बारणे दिसू लागले आहेत. त्या द्वेषापोटीच कोणतेही कारण नसताना भाजपचे पदाधिकारी त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजपचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी खासदार बारणे यांच्यावर टीका करण्याऐवजी स्वत:ची लायकी ओळखावी, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे थेरगाव विभागप्रमुख सोमनाथ गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

पवारांना वाईट वाटण्याचे कारण काय?
थेरगाव येथे अनधिकृत मिळकत धारकांचा मेळावा होता. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार बारणे यांनी, अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच आपण याप्रश्‍नी सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी काही नागरिकांनी राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप नियमावलीत जाचक अटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर बारणे यांनी, मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असे, आश्वासन दिले. त्यांनी यावेळी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा पदाधिकार्‍यांवर टीका किंवा आरोप केले नाहीत. त्यामुळे पवार यांना वाईट वाटण्याचे कारण नाही.

अनधिकृत बांधकामधारक त्यांना विचारत नाहीत
काही दिवसांपूर्वी वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकामधारकांच्या मेळाव्याप्रसंगी उत्साहापोटी भाषण करतांना एकनाथ पवार हे अनधिकृत बांधकामधारकांच्या विरोधात बोलले होते. त्यामुळे नागरिक प्रचंड भडकले होते. नागरिकांचा रोष पाहून एकनाथ पवार व आमदारांना तेथून पोलीस बंदोबस्तात पळ काढावा लागला होता. तेव्हापासून अनधिकृत बांधकामधारक आपल्याला विचारत नाहीत. आता हा प्रश्‍न सुटला तर त्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने कदाचित एकनाथ पवार यांनी हा प्रकार केला असावा, असेही गुजर यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीसाठी टीका
खासदार बारणे यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्यासाठीच एकनाथ पवार यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. खासदार श्रीरंग बारणे नगरसेवक असताना त्यांनी थेरगाव परिसराचा काय कायापालट केला? हे एकनाथ पवार यांनी थेरगाव येथे येऊन पहावे. हा विकास काही चार महिन्यात झालेला नाही. रेडझोन, पवना नदीसुधार, बोपखेल पुलाचा प्रश्‍न, याबाबत खासदार बारणे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे मंत्री हे प्रश्‍न मार्गी लावत नाहीत. हेच दाखविण्याचा प्रयत्न पवार यांनी केला आहे, असेही गुजर यांनी म्हटले आहे.