पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीचे विद्यमान विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी उपसूचनांचा नीट अभ्यास करावा आणि मगच सत्ताधार्यांनी केलेले ठराव, उपसूचनांवर टीका करावी. चुकीच्या आणि सुसंगत निविदांबाबत खुशाल कोर्टात दाद मागावी, असे खुले आव्हान सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी बहल यांना केले आहे.
महापालिका सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांनी गोंधळात अवलोकन विषयाला अंदाजपत्रकांची उपसूचना दिली. त्या ठरावानुसार प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्या निविदा रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी करून सत्ताधारी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर एकनाथ पवार यांनी बहल यांना प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधकांचे बोलणे चुकीचे
या विषयावर बोलताना एकनाथ पवार म्हणाले की, महापालिका सर्वसाधारण सभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही, चर्चा करू दिली जात नाही, हे विरोधकांचे बोलणे चुकीचे आहे. महापौर त्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची संधी देत असतात. विरोधक विनाकारण गोंधळ घालून सभेच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. तसेच, आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर, निश्चित ती चूक आमच्या निदर्शनास आणून द्यावी. त्या चुकीची सुधारणा करून कामे करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असेही पवार यांनी सांगितले.
चुकीची अंमलबजावणी नाहीच
महापालिका अंदाजपत्रक विषयाच्या ठरावाला मान्यता देण्याचा तसेच कुठल्या विषयाला उपसूचना द्यायची, हा निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाचा आहे. मात्र, सभागृहाने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करताना तो कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे, हे आधी प्रशासनाकडून तपासले जाते. तो कायदेशीर असल्यानंतरच त्या ठरावाची अंमलबजावणी केली जात असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने काढलेल्या निविदा प्रक्रियेत काहीच बेकायदेशीर नाही, असा खुलासादेखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.