विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल करू नये

0

एरंडोल । शहराबाहेर असलेल्या व नुकत्याच पालिका हद्दीत समाविष्ठ करण्यात आलेल्या नवीन वसाहतींमधील संपत्तीवर आकारण्यात आलेली वाढीव कर प्रणाली मागील सत्ताधारी असलेल्या खान्देश विकास आघाडीने मंजूर केलेल्या ठरावा नुसार आहे. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभुल करू नये, असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी पालिका कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख कासम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सरला पाटील, नगरसेविका आरती महाजन, छाया दाभाडे, जयश्री पाटील, युवा सेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील
उपस्थित होते.

कराबाबत माजी नगराध्यक्षांचा आरोप चुकीचा
नविन वसाहतींमध्ये लावण्यात आलेला कर मालमत्ता धारकांवर अन्यायकारक असल्यामुळे आम्ही सदर कर प्रणालीचा अभ्यास करून भांडवली मुल्यांऐवजी जुन्याच कर प्रणाली मुल्यानुसार कर आकारणी केली आहे. त्यावर देखील करात सूट मिळावी म्हणुन आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे विरोधकांनी खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभुल करू नये, असे आवाहन केले. तत्कालीन सत्ताधार्‍यांनी 5 मार्च 2012 रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक 15 मंजुर करून शहरात विकास करात भरमसाठ व अन्यायकारक वाढ केली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही ’क‘ वर्ग नगरपालिका क्षेत्रात विकास कराची आकारणी करण्यात येत नाही, मात्र तत्कालीन खान्देश विकास आघाडीने अशा प्रकारचा विकास कराचा ठराव मंजुर करून मालमत्ता धारकांवर अन्याय केला असुन सद्यस्थितीत माजी नगराध्यक्ष करवाढी संदर्भात खोटा अपप्रचार करून नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.विकास करामुळे घरांचे बांधकाम करणे व मालमत्तेची खरेदी विक्री करणे कठीण
झाले आहे.

बंद झालेले घंटागाडी पुन्हा चालू केल्यात
आम्ही सत्तेवर आल्यानंतर शहरात अनेक विकासकामे एका वर्षात पूर्ण केले आहेत.तसेच वीज वितरण कंपनीचे थकीत असलेले सुमारे 1 कोटी 35 लाख रुपयांचा थकीत बिलाचा भरणा केला असुन सुमारे 25 लाख रुपये दंड व व्याज माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात 14 अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले असुन अमळनेर दरवाजा परिसरातील शौचालय वातानुकुलीत आहे. सदरचे शौचालयाची केंद्र शासनाने दखल घेऊन त्याची परिगणना मॉडल शौचालय म्हणुन केली आहे. शहर हागणदारी मुक्त करण्यात पालिकेस यश आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेतून शहरात पाच घंटा गाड्या दररोज ओला व सुका कचरा जमा करीत आहेत. यापूर्वी सदरच्या घंटागाड्या बंद करण्यात आल्या होत्या. घंटागाड्या सुरु करण्यात आल्यामुळे शहरातील कच-याची समस्या दूर झाली आहे.विविध साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरात नियमित साफ सफाई करून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जाते.शहरात विविध रस्त्यांचे कामे पुर्ण करण्यात आली आहेत.

कर लावण्याचे पाप मागील सत्ताधार्‍यांचाच- नगराध्यक्ष
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी सांगितले कि मागील सत्ताधार्‍यांनी चतुःवार्षिक रिव्हिजन करून शहरातील मिळकतींवर 20 टक्के कर वाढ केली होती. त्यानंतर नगररचना विभागाकडून 8 टक्के कर वाढ कमी करण्यात आली होती. यावर्षी देखील आम्ही चतुःवार्षिक रिव्हिजन करून विस टक्के वाढ केली आहे. मात्र आम्ही नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक यांचेकडे मागणी करून केलेली कर वाढ जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून नागरिकांना दिलासा देणार आहे. मालमत्ता धारकांवर कराचा जास्त बोजा पडू नये म्हणुन सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहेत. तसेच वाढीव हद्दी मधील नविन वसाहतींना नवीनच लागु करण्यात आलेली कर प्रणाली मागील सत्ताधारी यांनी 3 ऑगष्ट 2016 रोजी झालेल्या सभेतील ठराव क्रमांक 789 नुसार लावण्यात आलेली आहे. नविन वसाहतींना लावण्यात आलेले कर भांडवली मुल्यावर आधारित आहे. भांडवली मुल्यावर कर लावण्याचे पाप मागील सत्ताधारी असलेल्या खान्देश विकास आघाडीचे असल्याचा आरोप नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केला.

अत्याधुनिक सेवा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न
आगामी काळात शहरातील तीनही स्मशानभूमींचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.तसेच आठवडे बाजाराचे नुतनीकरण करून आदर्श आठवडे बाजार उभारण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.नविन वसाहतींसाठी स्वतंत्र जलकुंभाचे बांधकाम करून पालिकेच्या कार्यालयाजवळ असलेल्या जुन्या जलकुंभाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.पालिकेचे कार्यालय अत्याधुनिक करून नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा व सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी सांगितले.विरोधक करीत असलेल्या अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.