विरोधकांशिवाय 12 व्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरळीत

0

मुंबई:- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पहिले दोन आठवडे वाया गेल्यानंतर अर्थसंकल्पात गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत 19 आमदारांना निलंबित केल्यापासून विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. आज अधिवेशनाच्या 12 व्या दिवशी विधानसभेत विरोधकांशिवाय कामकाज सुरळीत पार पडले. प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, पॉईंट ऑफ इंफॉर्मेशन यांसह शासकीय विधेयके मांडण्यात आली. तसेच कुठल्याही चर्चेशिवाय अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या रिकाम्या बाकांकडे पाहत आज या अधिवेशनातील सर्वाधिक काळ कामकाज झाले.

सेनेच्या आमदारांचा आक्षेप
यावेळी कुठल्याही चर्चेशिवाय अर्थसंकल्पास मंजुरी प्रदान करण्यात आली. यावेळी केवळ अर्थमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा व विजय औटी यांनी आक्षेप घेत चर्चेचा आग्रह धरला. मात्र विभागनिहाय चर्चेच्या वेळी यावर मत व्यक्त करण्याचे सांगत त्यांना चर्चा करून दिली नाही. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी अर्थसंकल्पात राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला असून सामान्यांच्या फायद्याचा असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात एखादी गोष्ट करायची राहिली असेल तर पुढच्या काळात नक्की पूर्ण करू असे आश्वासन दिले. यावेळी विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, विरोधक असेच वागत असतील तर पुढच्या वेळी जनताच ह्यांना अर्थसंकल्प ऐकण्यासाठी पाठवनार नाही असा टोला लगावला.