विरोधक नागरिकांमध्ये भीती पसरवित आहे; #CAB वरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर धन्यवाद सभा सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच या सभेने होणार आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे विशेष लक्ष लागले आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत मोदींची ही सभा होत आहे. यावेळी मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी मोदींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर भाष्य केले. हा कायदा दलित, शोषित, पिडीत जनतेच्या कल्याणासाठी हा कायदा केला आहे. मात्र काही लोकांना हा कायदा वाईट वाटत असून चुकीचा संदेश पसरवून देशात अशांतता पसरवित असल्याचे आरोप केले. सोशल मीडियात चुकीचे व्हिडीओ शेअर करून अफवा पसरवून तरुणांची माथी भडकविण्याचे काम विरोधक करत असून विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका असे आवाहनही मोदींनी उपस्थित जनसमुदायाला केले.

मुस्लीम समुदायाला भडकविण्याचा काम विरोधकांकडून सुरु आहे. मुस्लिमांना या कायद्याने कोणताही त्रास होणार नाही मात्र चुकीची माहिती पसरवून जनभावना उफाळण्याचे काम होत असल्याने विरोधकांनी थोडीशी तरी लाज बाळगली पाहिजे असा हल्लाही मोदींनी केला.

तुमच्या कल्याणासाठी हा कायदा बनविला असून त्याचे समर्थन करा. देशाच्या सर्वोच्च संसदेच्या कायद्याचा सन्मान करा, तुमच्या खासदारांनी हे विधेयक संमत केले असल्याने त्यांचाही सन्मान करा असे आवाहन मोदींनी केले.

यावेळी मोदींनी दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला. दिल्ली सरकारने दिल्लीकरांसाठी काहीही केले नाही शिवाय केंद्र सरकारच्या कामाठी अडथला आणण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप मोदींनी केले. समस्या तशाच ठेवणे हे आमच्या संस्कारात नाही असेही मोदींनी सांगितले. केजरीवाल सरकारने फक्त मोदी सरकारला विरोध करण्याचेच काम केले आहे असे आरोपही मोदींनी केला. दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाही. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या दिल्लीकरांना भेडसावत आहे. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. दिल्ली सरकारने फक्त आश्वासन देण्याचेच काम केले आहे, ते आश्वासन पूर्ण झाले नाही असे मोदींनी सांगितले.