पिंपरी-चिंचवड : निगडी ते दापोडी या महामार्गावरील वाहतूक व रस्त्याच्या आजूबाजूला असणारी रहदारी याचा विचार करता या मार्गावरील बीआरटी योग्य नाही. त्यामुळे हा प्रकल्प होऊ नये, अशी भूमिका भाजपाचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष राजू दुर्गे यांनी मांडली आहे. ज्या भारतीय जनता पक्षाने कडाडून विराध केला होता. त्याच भाजपाने सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प राबविण्याचा घाट घालणे क्लेशदायक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. याबाबत दुर्गे यांनी महापौर नितीन काळजे यांना निवेदन दिले आहे.
सारा प्रकारच क्लेशदायी
त्यात म्हटले आहे की, निगडी-दापोडी बीआरटी नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक आहे. हा प्रकल्प होऊ नये अशी भाजपाची 2008 पासूनची भूमिका आहे. 25 डिसेंबर 2008 ला काळभोरनगर येथे सुरू झालेल्या पहिल्या बसथांब्याचे काम भाजपा युवा मोर्चाने उद्ध्वस्त केले होते. 2008 ते 2017 या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महापलिकेत असताना त्यांनी बीआरटीचे कामकाज रेटून नेत हा उपक्रम राबविला. परंतु, ज्या भारतीय जनता पक्षाने कडाडून विराध केला होता. त्याच भाजपाने सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प राबविण्याचा घाट घालणे क्लेशदायक आहे.
पैशाची उधळपट्टी
या बीआरटी मार्गिकेत अनेक त्रुटी आहेत. बीआरटी बसेसना उजव्या बाजूला एकच मोठा दरवाजा असतो. दापोडी संपल्यानंतर उजव्या बाजूचे बसथांबेदेखील संपणार आहेत. त्यानंतर पुढे प्रवासी कोणत्या दरवाजाने उतरणार, पीएसपीच्या नावाखाली पालिका आणखी पैशांची उधळपट्टी करणार आदी प्रश्न दुर्गे यांनी उपस्थित केले आहेत. उपाययोजना राबविल्यानंतरच हा प्रकल्प राबवावा, अशी मागणीही दुर्गे यांनी केली आहे.