जळगाव। विरोधात असतांना जनतेचे नेमके प्रश्न कळत असल्याचे शरद पवार साहेब नेहमी सांगत असून याची प्रचिती आपल्याला येत असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहरात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलतांना केला.
दरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून विविध मुद्यांना स्पर्श करत शिवसेनेसह भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
या पध्दतीने राज्य कसे चालणार?: कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी राष्ट्रवादी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय मुकमोर्चा काढण्यात आला होता. यानंतर श्रीकृष्ण लॉन येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी मार्गदर्शन करतांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, राज्यमंत्र्यांचा वाहनचालक एका डॉक्टरांना धमकी देतो की, नरेंद्र दाभोळकर करून टाकू मात्र पोलिसांत एन.सी दाखल होते. त्यावर आजपर्यत कोणतीच कारवाई होत नाही. अशा पध्दतीने राज्य चालणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नशिराबाद-भादलीचे नागरिक उपोषणला बसले असतांना त्या ठिकाणी मंत्र्याचे येण्याचे काम नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर, जिल्हापरिषदेमध्ये पोषणआहारात भ्रष्टाचार उघडकीस आला याच्या मागे अधिकारी कोण? असा सवालही त्यांनी केला.
निधी देण्यात कमतरता नाही
अजित पवार म्हणाले की, आमची सत्ता असतांना आम्ही पाडळसरे धरणासाठी निधी दिला. रोजगार हमी योजनेचे कामे काढली. रस्त्यासाठी निधी दिला. पक्षाच्या सहा आमदारांना कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाही. कारण ती आमची बांधिलकी होती. आम्ही कोठेच कमी पडले नाही. आम्ही कार्यकर्त्यांनी फळी उभी केली. हे ठराविक ठिकाणी होणे गरजेचे नाही. तालुक्यातुन प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. ‘चला घरी चहा प्यायला’ असे म्हटल्याने याने पक्ष वाढत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली पाहिजे. नेत्यांनी काम करतांना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये. असे तुमचे वागणे असले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
घड्याळाचे बटन दाबायला शिका
दरम्यान शहरातील हॉकर्सनी अजित पवार यांना निवेदन दिल्यावर त्यांनी चिमटा काढला. ते म्हणाले की, तुम्ही दुसर्यांना मते देतात मात्र कामे आम्हाला सांगतात ह्या गोष्टी सोडा, तुम्हीसुध्दा घड्याळाचे बटन दाबायला शिका असा टोलावजा सल्ला हॉकर्सना दिला.जिल्ह्यात पाणीप्रश्न निर्माण झाले आहे. 5/2/17 पर्यंत जिल्ह्यात 15.9 मिमी पाऊस झाला आहे. धरणाचे कामे बंद पडली असून त्याला निधी नाही. तुम्हाला भ्रष्ट्राचार वाटत असेल तर चौकशी करून त्यावर कारवाई करा. त्याकरीता कामे थांबविली तर तेथील जनतेने पाण्यासाठी कोणाकडे पाहायचे? शेतीचा पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार? असा सवालही त्यांनी केला.
कर्जमाफीची यादी मिळावी
अजित पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून पैसा मिळत नसून कर्जमाफीच्या याद्या मिळाल्या पाहिजे. कोणाला किती कर्ज माफी झाली याची माहिती मिळाली पाहिजे. कर्जमाफीसाठी 35 हजार कोटी रूपयांची गरज आहे.तर शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेकडे 60 हजार कोटीचे डिपॉजिट आहे. मग उध्दव ठाकरे महाराष्ट्रात फिरण्यापेक्षा व ढोल वाजविण्यापेक्षा शेतकर्याच्या कर्जमाफीसाठी त्यांनी हा पैसा देण्याची गरज आहे. शेतकर्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट या जिल्ह्यात ओढवलेले आहे. यामुळे ‘कृषीमंत्री दाखवा 10 हजार रूपये मिळवा’ असा टोला त्यांनी मारला. जर उध्दव ठाकरे यांना जर शेतकर्यांवर प्रेम असेल तर मुंबई महापालिकेकडे असला पैसा द्यावा नंतर सरकारकडून काढून घ्यावा असे आव्हानही त्यांनी दिले.
आमचे पाणी गुजरातमध्ये जात आहे- तटकरे
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या भाषणातम्हणाले की, जिल्ह्यातील कार्यकर्ता पवार साहेबावर प्रेम करतो. भाजपामागे शिवसेना फरपटत गेली आहे. कर्जमाफीचा शरद पवारांनी निर्णय घेतला मात्र या सरकारचे कर्जमाफीबद्दल धोरण निश्चित नाही.जोपर्यंत 34 हजार कोटीची कर्जमाफी होणार नाही तोपर्यत स्वस्थ बसणार नाही. शिवसेनेची दुटप्पी भुमिका आहे. जिल्ह्याला वरदान असलेल्या तापीचे पाणी गुजरातला देण्यात धन्यता मानणारे नेत्यांनी ते पाणी अडविण्याची भुमिका घेतली नाही. शिवसेना भुकंप होण्याची घोषणा करतो मात्र जर भुकंप याच्या सांगण्यावर झाला असता तर जिवीतहानी व वित्तहानी टाळता आली असती.सत्तेत राहून तुम्ही म्हणतात सरकार नालायक आहे मात्र आम्हाला पवारसाहेबांनी आम्हाला संस्कृती शिकवली आहे.त्यामुळे तुमचे 12 मंत्री कोण ते सांगा? असा प्रश्न केला.
नेत्यांमध्ये एकता नाही-वळसे -पाटील
माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, अजित पवारांना प्रमुखपदी पाहायचे असेल तर आपल्याला दिशा ठरवावी लागेल. जिल्हापरिषदेत पक्षाने ताकद देवूनही फक्त 16 जागा दिल्या. तेव्हा कॉग्रेसची स्पष्ट भुमिका दिसली नाही.काय बदल करायचे ते करा मात्र प्रत्येक वार्डात पक्षांची बांधणी झाली पाहिजे. येथ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असुनही विरोधी पक्षांशी लढण्यापेक्षा ते आपसातच लढतात. आर्थिक अडचणी असतील तर मला सांगा ती दुर करेल.हे ही जमत नसेल तर मी सांभाळतो पक्ष कार्यालय उद्या निवडणुका जिंकायच्या असून तयारीला लागा असा सल्ला त्यांनी दिला.
महिलाच सुरक्षित नाही -चित्रा वाघ
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या की, ज्या राज्यात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा नारा दिला जात आहे. त्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. कोपर्डीतला प्रकार डोळ्यासमोर आला तरी डोळ्यातुन पाणी येते. एक वर्षपुर्ण झाले असून काहीच प्रगती दिसत नाही. राज्याच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहे. मंजुळा शेट्टे हत्येत कोणाला वाचविण्यात येत आहे? जेल निरिक्षक महिलेच्या पत्रानुसार त्यांचे वरिष्ठ अधिकारी बलात्कार करतात. जेवढी गाईची काळजी तेवढीच बाईची काळजी घ्या. राज्यात रामराज्य येईल.
शिवसेना फुसका बॉम्ब-आ. डॉ. सतीश पाटील
जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील म्हणाले की, शिवसेनेचे नेते कर्जमाफी झाली असे सांगत आहे. खरेच कर्जमाफी झाली असेल आणि ती मिळाली असेल तर मी त्यांची माफी मागेल. जिल्ह्यात दुबारपेरणीचे संकट आहे. पवार साहेबांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा कोणताच निकर्ष लावला नाही.पालकमंत्री पर्यटकासारखे येतात ,नियोजन बैठक 15/20 मिनिटात संपवितात. आणि काही नेते भजी खाण्यात मग्न आहे. लेटर पॅडच्या बाहेर या. शिवसेना फुसका बॉम्ब, ते फक्त घोषणा देत आहे त्याच्याकडून काहीच होणार नाही.
हे तर जॅकेटचे सरकार -देवकर
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, सध्याचे सरकार जॅकेटचे सरकार आहे. आपल्या नेत्याने जॅकेट घातले की या राज्यातील नेतेही त्याप्रमाणे जॅकेट घालू लागतात.त्यामुळे हे जॅकेटचे सरकार आहे. जीएसटी लागु झाल्यानंतर कामगार व शेतकरी बोलू लागले आहे. कर्जमाफी झाली आहे का? या संदर्भात स्पष्ट आदेश दिलेले नाही. हे थापाडे सरकार आहे.दिशाभूल करणारे सरकार आहे. या संधीचा फायदा घेण्याची संधी आहे. ती आपण जरूर घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.