फोनही टॅप होत असल्याची माहिती; विखे पाटील यांची आयुक्तांकडे तक्रार
मुंबई :- विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अ -६ या शासकीय बंगल्यात पोलीस हेरगिरी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विखे पाटील यांच्या शासकीय अ – ६ या बंगल्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचे रिपोर्टींग पोलिसांच्या गुप्तहेर खात्याचे अधिकारी करत असल्याचे निदर्शनाला आले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरात कोणतीही परवानगी न घेता पोलीस विभागाच्या गुप्तहेर विभागाचे अधिकारी कसे काय प्रवेश करू शकतात असा सवाल पाटील यांनी केला आहे.
दरम्यान दोन पोलीस पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याचे प्रकरण समोर आल्यावर विखे पाटील यांनी याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे फोन वर तक्रार केली आहे असे त्यांनी सांगितले. केवळ हाच प्रकार नाही तर गेले अनेक दिवस माझे फोन टॅप होत असल्याचेही त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. हे पहिल्यांदा होत नाहीये. परवानगी न घेता येण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील केला.
विरोधीपक्ष नेत्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या गुप्तहेर खात्याचे पोलीस अधिकारी माहिती घेत असल्याचे विखे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याचा जाब विचारला. तुम्हाला इथे कुणी पाठवले. या बंगल्यात येण्याआधी तुम्ही रीतसर परवानगी घेतली आहे का? असे प्रश्न त्यांनी पोलीस अधिकारी सुभाष सामंत आणि बाजीराव सलगरे यांना विचारले . मात्र याबाबत आम्ही कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्या विभागाने तुम्हाला इथे येण्यासाठी सूचना दिली का ? या प्रश्नावरही ते अधिकारी निरुत्तर झाले. या प्रकारानंतर विखे पाटील यांनी तात्काळ पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना फोन केला. हा प्रकार निंदनीय असून सरकारच्या सूचनांशिवाय हा प्रकार घडलेला नाही असे पाटील यांनी यावेळी सांगितले .