विरोधी धोरणाचा जाळला पुतळा

0

भुसावळ। आयुध निर्माणीचे खाजगीकरण करण्याच्या दृष्टीने येथील आयुध निर्माणीतील 16 प्रकारचे उत्पादन नॉन कोअर गृपमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात देशातील 17 आयुध निर्माणीतील एकूण 143 प्रकारचे उत्पादनाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुध निर्माणी विरोधी धोरणाचा ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनतर्फे गुरुवार 22 रोजी प्रवेशद्वारासमोर पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या आदेशाने देशातील सर्व 41 आयुध निर्माणीत भारत सरकारचा निषेध आंदोलन सुरु आहे. भुसावळ आयुध निर्माणीमध्येही कामगार युनियनच्या वतीने पूर्ण जून महिना हा राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी ‘संरक्षण उद्योग बचाव’ आंदोलन केले जात आहे. यावेळी निर्माणी मुख्यद्वारासमोर काळे झेंडे दाखवून शासनाच्या धोरणाविरुध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात सापडण्याची शक्यता
आयुध निर्माणीतील मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करताना निर्माणीतील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात मेक इन इंडिया या शासनाच्या योजनेनुसार देशी उद्योगांना वाढविण्यासाठी संरक्षण उत्पादन खाजगी क्षेत्रात देण्याची तयारी सरकारने चालविली आहे.

मात्र संरक्षर उत्पादन क्षेत्र हे खाजगी उद्योगपतींकडे गेल्यास यातील गोपनियतेचा भंग होऊन देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कामगारांमध्ये सरकारविरोधी रोष असून आंदोलनात कामगार सहभागी होत आहेत.

मागण्यांसाठी मोर्चा काढणार
आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन पंतप्रधानांना देखील निवेदन देण्यात येणार आहे. 3 जुलै पासून पावसाळी अधिवेशनात दिल्ली येथे संसदेसमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. 27 एप्रिल रोजी रक्षा मंत्रालयाकडून अ‍ॅम्युअल केेलेल्या ऑर्डरनंतर कामगार आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. मात्र कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठी अफवा पसरविण्यात येत आहे. अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन युनियनतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी सरकारने ऐकून न घेतल्यास संपावर जाण्याची तयारीही कामगारांनी दर्शविली आहे. यासंदर्भात आजच्या सभेत कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम
युनियनचे अध्यक्ष व एआयडीईएफचे उपाध्यक्ष राजेंद्र झा यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येत आहे. यशस्वीतेसाठी दिनेश राजगिरे, किशोर बढे, किशोर पाटील, योगेश आंबोडकर, दिपक निळे, रेखा आव्हाड, ज्ञानदेव कोळंबे, महेंद्र पाटील, दिपक पारिसकर, प्रल्हाद भावसार, भिमा सुरवाडे, सुजीत देवगिरी, रोशन चौधरी, प्रविण बार्‍हे, गजभिए आदी पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रवेशद्वारबाहेर झालेल्या आंदोलनात बहुसंख्य कर्मचार्‍यांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे संपुर्ण परिसर दणाणून निघाला.