दत्ता साने यांचा उपक्रम
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी जनतेत मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी साने यांनी ‘विरोधी पक्षनेता’ उपक्रम हाती घेतला आहे. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपने एका वर्षात मोठ्या प्रमाणात चुकीची कामे केली आहेत. कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत हा भ्रष्टाचार जनतेला सांगणार असल्याचे साने यांनी भोसरी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सांगितले.
जुन्या उपक्रमावरून प्रेरणा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला होता. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. त्यानंतर पिंपरी पालिकेत पहिल्यांदाच ‘विरोधी पक्षनेता’ आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अनेक वर्षांनंतर विरोधात बसावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘विरोधी पक्षनेता’ आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. नुकतीच विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या दत्ता साने यांनी याबाबतची माहिती दिली.
भ्रष्टाचाराची माहिती जनतेला देणार
भोसरीतील आढावा बैठकीत बोलताना साने म्हणाले, सत्ताधारी भाजपने गेल्या सव्वा वर्षात पिंपरी महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. गेल्या चार वर्षात केंद्र, राज्य सरकारकडून एक रुपयाचाही निधी शहरासाठी आणला नाही. केवळ वल्गना केल्या जात आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराची या उपक्रमातून जनतेला माहिती दिली जाणार आहे. प्रभागातील पक्षाच्या नगरसेवकांसोबत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या प्रभागात पक्षाचा नगरसेवक नाही. तेथील माजी नगरसेवक, पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे. गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या माध्यमातून शहराचा बदललेला चेहरा जनतेसमोर मांडणार आहोत.