विरोधी पक्षनेतेपदी दत्ताकाका साने!

0

अखेर दत्ताकाका सानेंना राष्ट्रवादीकडून न्याय!
गटनेतेपदी सानेंची राष्ट्रवादीकडून निवड, विभागीय आयुक्तांकडे नोंदणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अगदी अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता महापालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे. त्यामुळे साने पालिकेचे नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत.

बहल यांच्या राजीनामा
महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने तगडा मोहरा असलेल्या योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या बहल यांनी एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शनिवारी (दि. 5) पदाचा राजीनामा दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र
बहल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी मंगळवारी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे. दरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी साने यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिल्यानंतर त्यांची अधिकृत नियुक्ती होईल.

साने ज्येष्ठ व आक्रमक नगरसेवक
दत्ता साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. भोसरी मतदारसंघात येत असलेल्या चिखली परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली असल्याचे बोलले जात आहे.