विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना कशाची काळजी वाटतेय!

1
बहुमतामुळे सत्तापक्षाची चुकीची कार्यपध्दती सुरु असल्याचा आरोप 
नागपूर- आजकाल बहुमताचा आकडा वाढला की, आपण काहीही करु शकतो अशी मानसिकता वाढीस लागली असून सत्तापक्ष ज्या कार्यपध्दतीने काम करत आहे त्यामुळे काम करावं की नाही याची मला काळजी वाटून राहिली आहे अशी भीती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संसदीय अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली. संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे स्थान,कर्तव्ये आणि विधीमंडळातील भूमिका या विषयावर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ४८ व्या अभ्यासवर्गात विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सत्तापक्ष कितीही मजबुत असला तरी विरोधी पक्षाचा एक सदस्य सरकारला अडचणीत आणू शकतो,घाम फोडू शकतो एवढी ताकद विधीमंडळाने दिलेल्या कायदयात आहे. वेगवेगळे कायदे राज्यसरकार करते,वेगवेगळी विधेयके,अध्यादेश काढते त्याचे रुपांतर कायदयात होण्यासाठी विरोधी पक्षाची सत्ताधाऱ्यांना आवश्यकता असते.
एखादा कायदा जनताविरोधी असेल,जनतेच्या भल्यासाठी नसेल तर तो कायदा परत घ्यायला लावण्याची ताकद विरोधी पक्षात असते. सत्ताधारी नेहमी विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडले असा आरोप करते. हो आम्ही सभागृह बंद पाडतो कारण सत्तापक्ष योग्य तो निर्णय घेत नसल्यामुळे,सदनामध्ये दिलेला शब्द खोटा असेल तर तो कुठल्या अर्थाने आम्ही मंजुर करायला दयायचा असा सवालही धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना केला. सरकारने चुकीचे निर्णय किंवा विधेयक आणले तर त्याबाबत कधीच सरकारशी हातमिळवणी केली नाही हे अभिमानाने सांगतो असेही मुंडे म्हणाले.
अनेक प्रसंगामध्ये सत्तापक्ष आणि विरेधी पक्ष यांच्यामध्ये हमरीतुमरी किंवा टोकाची भूमिका घेतली जाते परंतु हे सगळं विरोधी पक्ष जनतेच्या प्रश्नावर,त्यांच्या हितासाठी करत असतो हे लक्षात घ्या.सत्तापक्ष काम नुसती रेटत असतो ते चुकीचं आहे हे सांगण्याचे काम विरोधी पक्ष करत असतो.सत्तापक्षापेक्षा विरोधी पक्षाला विधीमंडळाच्या कायदयामध्ये सर्वाधिक आयुधे दिली असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुंडे यांनी विद्यार्थ्यानी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मी मोठया राजकीय कुटुंबातुन आलो असलो तरी कोणतेच पद मला सहज मिळाले नाही तर त्यासाठी मला संघर्ष करावा लागला असे ते म्हणाले.