विरोधी पक्षनेते पाटलांना मानहानीची नोटीस पाठवणार – मुख्यमंत्री

0

मुंबई : विकास आराखड्याच्या मुद्यावरून सरकारवर आरोप करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मानहानीची नोटीस पाठवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये बदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने 10 हजार कोटींची डील केली. त्यातील 5 हजार कोटींचा पहिला हप्ता पोच देखील झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जणू मुंबईचा ‘सौदा’ केल्याचही विखे पाटील यांनी म्हटले होते.

राज्य सरकारने येत्या 15 जानेवारीपर्यंत मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील बिल्डरधार्जिणे बदल रद्द न केल्यास हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला होता. विखे पाटलांनी मुंबईविकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील कोणत्या बदलांमुळे कोणत्या बिल्डरांना किती हजार कोटींचा लाभ झाला, याची यादीच जाहीर केली होती.

विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी जर हा प्लॅन कसा तयार होतो हे जर समजून घेतले असते, तर हा प्रश्न विचारलाच नसता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.