मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले आहे. काल महाविकास आघाडीने बहुमत विश्वासदर्शक ठराव देखील जिंकला. १६९ आमदारांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिला. आज विधानसभा अध्यक्षपदी कॉंग्रेसचे नाना पटोले यांची तर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. दरम्यान आज निवड प्रसंगी अभिनंदनाचा ठराव करताना सर्व पक्षीय नेत्यांकडून माजी मंत्री प्रदीर्घ काळ विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथराव खडसे यांची आठवण जागृत करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. अभिनंदनाच्या ठरावावेळी विरोधी पक्षनेता कसा असावा? याचा आदर्श एकनाथराव खडसे यांच्याकडून घेतले पाहिजे. सरकारवर आरोप करताना केवळ प्रसिद्धीसाठी आरोप होऊ नये याची काळजी खडसे यांनी नेहमीच घेतली. तीच काळजी आताच्या विरोधी पक्षनेत्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी एकनाथराव खडसे विधिमंडळात नाही, पण त्यांच्या कामाच्या पद्धतीची आठवण सभागृहात होताना दिसत आहे.
राष्ट्रवादीकडून मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेत्यांचे अभिनंदन करत एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या कामगिरीची आठवण करून दिली.
यावेळी एकनाथराव खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ते विधानसभेत गेले नाही. मात्र सभागृहात त्यांची उणीव भासते ते सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणावरून दिसून येते. एकनाथराव खडसे यांनी सत्ताधारी पक्षाला जेरीस आणून सोडले होते, उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून आजही त्यांच्याकडे पहिले जाते.