विरोधी पक्षांची पुढची संघर्षयात्रा १६ मे पासून

0

मुंबई – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी तसेच त्यांच्या इतर समस्यांवर मार्ग काढण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षांतर्फे काढम्यात येणाऱ्या संघर्षयात्रेचा शेवटचा टप्पा येत्या १६ तारखेपासून महाडच्या चवदार तळ्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आशिर्वाद घेऊन या दौऱ्याची सुरूवात केली जाणार आहे. ज्या ठिकाणाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यासाठी लढा दिला त्या चवदार तळ्यालादेखील या संघर्षयात्रेदरम्यान भेट देणार आहोत. या दौऱ्याची सांगता बांदा येथे होईल, असे ते म्हणाले. या संघर्षयात्रेचे तीन टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. या तीनही टप्प्यांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला भाव, तूरीला भाव हे मुद्दे आम्ही या संघर्षयात्रेत लावून धरले. सरकारने काही प्रमाणात या मुद्द्यांची दखल घेत हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ताधारी मंडळींनी संघर्षयात्रेचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे. म्हणूनच त्यांनी संघर्षयात्रेच्या पार्श्वभूमीवर संवादयात्रेचे नियोजन केले आहे. हे संघर्षयात्रेचे यश आहे. तूर खरेदीबाबत सरकार निव्वळ घोषणाबाजीच करत आहे. राज्य सरकारने तूर खरेदीबाबत योग्य नियोजनच केलेले नाही. सरकारतर्फे पिककर्जाबाबतही नियोजन होताना दिसत नाही. बी-बीयाण्याचे उत्पादनही कसे करणार याचे स्पष्टीकरण सरकार देत नाही, अही तटकरे यांनी सांगितले..

पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर
१० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे. ११ जूनपासून मी, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आणि आमचे प्रमुख पदाधिकारी राज्यव्यापी दौरा करणार आहोत. या दौऱ्यात युवक, महिला, विद्यार्थी आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. या दौऱ्यात पक्षाची संघटना मजबूत कशी करता येईल यावर भर दिला जाईल. त्यानंतर शरद पवार यांचा विदर्भापासून दौरा सुरू होईल. आम्ही त्या दौऱ्यातही आपला सहभाग नोंदवू. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची शिबिरे घेतली जातील. त्यांच्या विभागातील प्रश्न समजून घेतले जातील व ते प्रश्न मार्गी लागण्याबाबत पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.