विरोधी पक्ष हे शेतकरी नेत्यांच्या आडून पसरवत आहेत अशांतता

0
मुख्यमंत्र्यांनी केला गंभीर आरोप 
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी काल शेतकरी आंदोलनाबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. शेतकरी नेत्यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे राज्यात अशांतता पसरवून आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात केला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, राज्यात जी शेतकऱ्यांची अवस्था आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेला भ्रष्ट्राचार कारणीभूत आहे. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला आघाडीचे नेतेच जबाबदार आहेत. युती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र राज्यात अशांतता पसरवण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पडले जात असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
दुधाच्या भुकटीच्या निर्यातीसाठी देणार अनुदान 
युती सरकारने मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार हि योजना राबवल्यामुळे राज्यात कृषी उत्पन्न वाढले असून त्या कृषी उत्पन्न चांगला दर देण्याचे आव्हान सरकारपुढे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केले. ज्या शेतकऱ्यांनी तूर आणि हरभऱ्याची नोंदणी केली आहे. मात्र त्यांची खरेदी झाली नसल्यास त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १६० कोटी रुपये देणार असून दुधाच्या भुकटीच्या निर्यातीसाठी ही अनुदान देण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.