नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला येण्याचे निमंत्रण स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र यापूर्वी संघाच्या कार्यक्रमांना संघ विचारधारेच्या विरोधात असलेल्या अनेक जणांनी उपस्थिती लावली आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खास अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा समावेश होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्षभरात विजयादशमी उत्सव, तृतीय संघ शिक्षा वर्ग, गुढीपाडवा हे तीन प्रमुख कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांना सरसंघचालकांची प्रमुख उपस्थिती असते. प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तीला निमंत्रित केले जाते.
हे राहिले आहे उपस्थित
यापूर्वीही संघ विचारधारेचे विरोधक म्हणून ओळख असणाऱ्यांनी येथे उपस्थिती लावली आहे. २०११ मध्ये शंकराचार्य, जयेंद्र सरस्वती, २०१२ मध्ये पंजाब केसरी दैनिकाचे संचालक अश्विनीकुमार, २०१३ मध्ये कर्नाटकचे स्वामी निर्मलानंद महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचे नातू समरजीतसिंह गायकवाड, २०१४ मध्ये श्री श्री रविशंकर, २०१५ मध्ये धर्मस्थळीचे प्रमुख वीरेंद्र हेडगे, २०१६ मध्ये साप्ताहिक वर्तमानाचे संपादक रतिदेव सेनगुप्ता, २०१७ मध्ये नेपाळचे माजी सरसेनापती रुकमानगड कटवाल आदींनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे.
९२ वर्षाची परंपरा
संघाने गेल्या ९२ वर्षांत जाणीवपूर्वक त्यांच्या विचारधारेच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्यांना आपल्या व्यासपीठावर स्थान दिले आहे. त्यातून त्यांना संघ सर्वसमावेशक असल्याचा संदेश द्यायचा असतो. आजवर संघाच्या व्यासपीठावरून त्यांच्या विचारधारेवर उघड टीका करून वाद निर्माण झाल्याचे प्रसंग आले नाहीत, असे संघातील सूत्रांचे म्हणणे आहे.
यापूर्वी विजयादशमीच्या कार्यक्रमाला राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष राजाभाऊ खोब्रागडे, माजी राज्यपाल रा.सू. गवई, आरपीआय नेते दादासाहेब गायकवाड यांना बोलावण्यात आले होते. तसेच तृतीय संघ शिक्षा वर्गाला बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांचे नातू समरजीतसिंह गायकवाड, नेपाळचे माजी सरसेनापती रुकमानगड कटवाल यांनी हजेरी लावली आहे. संघाच्या प्रसिद्धी विभागाने दिलेल्या माहितीनुसार माजी उपराष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन, जयप्रकाश नारायण हेदेखील संघाच्या कार्यक्रमांत सहभागी झाले आहेत. जनरल करियप्पा १९५९ मध्ये मंगलोर संघ शाखेत प्रमुख पाहुणे होते.