विरोध केला तरच चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसेल

0

सहाय्यक पोलीस प्रशांत आरदवाड यांचे मत

पिंपरी चिंचवड : शालेय परिसरात तसेच समाजात वावरताना अनेकवेळा मुलींना, महिलांना छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशा वेळी मुलींनी न घाबरता विरोध केला पाहिजे तरच चुकीच्या प्रवृत्तीना आळा बसेल. यासाठी पोलीस आपली भूमिका ठामपणे बजावित आहेत. भयमुक्त समाजासाठी पोलीस कटिबद्ध असून अभयदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मत यमुनानगर निगडी पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड यांनी व्यक्त केले.

मॉडर्न हायस्कूलमध्ये तक्रार पेटीचे उद्घाटन…

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बसविण्यात आलेल्या ’तक्रार पेटी’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपकार्यवाह शरद इनामदार, प्राचार्य सतीश गवळी, सुमती पाटसकर, ज्युनिअर कॉलेजचे समन्वयक विवेक धडफळे, प्रिती वाघोलीकर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहराचे नवीन पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून शहरातील अनेक शाळा, सोसायट्या अशा ठिकाणी या तक्रार पेट्या ठेवणार असल्याचे आरदवाड यांनी सांगितले.

त्रास देणार्‍यांची निर्भीडपणे तक्रार करा…

मुलींना, महिलांना जर कोणी त्रास देत असेल तर निर्भीडपणे आपली तक्रार सदर पेटीत टाकावी. या तक्रारपेटीची चावी केवळ पोलीस आयुक्तांकडे असल्याने तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. निनावी तक्रार देखील देऊ शकता, मात्र ही तक्रार खरी आणि स्पष्ट स्वरूपात असावी. तसेच आपण केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही तर अशा पोलिसांची देखील माहिती आपण पोलीस आयुक्तांना या तक्रार पेटीत करू शकता, असे आरदवाड म्हणाले.

पोलीस आयुक्त घेणार दखल…

अपमानास्पद शेरेबाजी, छेडछाड, क्रूर वागणूक, विनयभंग, दादागिरी, अमली पदार्थ विक्री, लैंगिक अपराध, कॉलेजमधील रॅगिंग, मुलींचा पाठलाग करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, प्रेशर हॉर्न, रिव्हर्स हॉर्न, विद्यार्थी वाहतूक संदर्भातील तक्रारींची दखल पोलीस आयुक्त घेणार आहेत. सामान्य नागरिकांत देखील एक पोलीस दडलेला असून तो जागृत असणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य सतीश गवळी म्हणाले , मुलींनी आणि मुलांनी योग्य तीच तक्रार सदर पेटीत टाकावी, केवळ खुन्नस म्हणून खोटी तक्रार करू नये. तसेच मुलींनी निर्भयपणे तक्रार मांडल्यास योग्य ती कार्यवाही होऊ शकेल.