विरोध कोविंदांना नाही, संघ स्वयंसेवकाला!

0

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आणि जातीय राजकारणाचा नवा अध्याय घडण्यास सज्ज झाला. जातीय राजकारण या अर्थाने म्हणत आहोत, की कोविंद यांची उमेदवारीच मुळात जातीय भावनेतून जाहीर केली गेली असून, त्यामागे भाजप नेतृत्वाच्या डोक्यात दलितवर्गाची मते मिळविण्याचा हेतू आहे, हे अगदीच उघड आहे.

कोविंद कोण आहेत? मुळात ते दलित आहेत, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. आणि, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे त्यांना राष्ट्रपती करुन भाजपला राजकीय फायदा घ्यायचा आहे. दलित व्यक्तीने राष्ट्रपती व्हावे, यापेक्षा दुसरे भूषणावह काहीही नसेल. त्यामुळे कोविंद यांच्या उमेदवारीला कुणाचाही आक्षेप नाही. आक्षेप असेलच तर तो त्यांच्या रा. स्व. संघाशी निगडीत असलेल्या पार्श्वभूमीला आहे. ते दलित आहेत म्हणून भाजप किंवा संघाने त्यांना उमेदवारी दिली नाही. तसे असेल तर या देशात कोट्यवधी दलित आहेत, त्या पैकी कुणालाही भाजपने उमेदवारी द्यावयाची होती. भाजपने दलित नव्हे तर संघाच्या स्वयंसेवकाला उमेदवारी दिली असून, संघ स्वयंसेवक देशाचा राष्ट्रपती झालेला त्यांना पहायचा आहे. ते त्यांचे स्वप्न कोविंद यांच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. खरे तर रा. स्व. संघाचे असेच काही एखाद-दुसरे स्वप्न नाही. त्यांची असंख्य स्वप्ने असून, ती सर्वच पूर्ण करायची म्हटले तर त्यांच्यातील उच्चवर्णीयांना पुढे करून ती पूर्ण होणारी नाहीत. त्यासाठी दलित-बहुजन समाजातील आपल्यात माणसाळलेली ज्यांना संघाळलेली म्हटले जाते ती माणसे त्यांना हवी आहेत. कोविंद हे त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणावे लागेल.

उद्या ते राष्ट्रपती झाले तर त्यांची जात हा घटक महत्वाचा राहणार नाही. कारण, ते देशाचे प्रथम नागरिक, बहुमान ठरतील. ते राष्ट्रपतीच असतील आणि त्यांच्याकडे राष्ट्रपती म्हणूनच पाहिले जाईल. दुसरीकडे, देशात मात्र एक स्वयंसेवक पंतप्रधान झाला, दुसरा स्वयंसेवक राष्ट्रपती केला याचा केवढा म्हणून अभिमान संघाला असेल, याची कल्पना करवत नाही. अनेकांना जी काही पोटदुखी असेल ती अशाप्रकारची असेल. एनडीएकडे बहुमत आहे. ते त्यांचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून आणणारच आहेत. त्यामुळे कोविंद यांच्या निवडीची आणि एकूणच या निवडणुकीची औपचारिकता तेवढी उरली आहे. कोविंद यांच्या नावाला पाठिंबा द्यावा की स्वतंत्र उमेदवार द्यावा, याबाबत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)मध्ये एकवाक्यता झालेली नाही. त्यांच्या नावाला यूपीएतील काँग्रेससह सर्वच घटक पक्ष आणि खास करून समाजवादी पक्ष, डावे पक्ष आदी राजकीय पक्ष पसंती देऊच शकत नाहीत. त्याला कारण ते संघाचे उमेदवार आहेत, हे एकमेव कारण आहे. त्यामुळे लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार किंवा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांपैकी एका दलित नेत्याला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उभे करण्याची राजकीय खेळी युपीएकडून खेळली जाऊ शकते. मीरा कुमार यांच्या नावासाठी काँग्रेस आग्रही आहे, असे हा अग्रलेख लिहिपर्यंत तरी राजधानी दिल्लीत वातावरण होते. त्यामुळे या निवडणुकीत यूपीए असो की सत्ताधारी एनडीए असो दोन्ही आघाड्या या दलित कार्ड खेळत असून, त्यामागे दलितांच्या उत्थानाची भावना असण्यापेक्षा आपले सोयीस्कर राजकारण ही प्रबळ भावना आहे, हे न कळण्याइतपत देशवासीय नक्कीच दूधखुळे नाहीत.

उमेदवार कुणीही असला तरी तो दलित असेल हे मात्र यानिमित्ताने आपसूक स्पष्ट झालेले आहे. यापूर्वी के. आर. नारायणन् यांच्या रुपाने देशाला पहिले दलित राष्ट्रपती मिळाले होते. आता कोविंद यांच्या निमित्ताने देशाला दुसर्‍यांदा या समूहातील राष्ट्रपती मिळणार आहे. आम्ही मात्र थोडे राजकारणापलिकडे या मुद्द्याकडे पाहात आहोत. राष्ट्रपतिपदासाठी अशा प्रकारचा राजकीय किंवा जातीय अभिनिवेष नसावा, अशी आमची भावना आहे. मुळात राष्ट्रपती हे सन्मान आणि देशाच्या अस्मितेचे पद असून, त्या पदाचा योग्य तो आदर जपला जावा. तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी या पदाची निवडणूक ही बिनविरोधच केली पाहिजे, आणि तसा चांगला पायंडा पाडला जावा. कोविंद यांच्या रुपाने संघाने पाहिलेले एक भलेमोठे स्वप्न साकार होत असले तरी, त्या पदावर गेल्यानंतर कोविंद यांनीही आपल्यातील संघ स्वयंसेवक बाजूला सारायला हवा. रामनाथ कोविंद हे दलित नेते राष्ट्रपती भवनात गेलेच पाहिजेत. त्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, या नावाचा संघ स्वयंसेवक जर राष्ट्रपती भवनासारख्या लोकशाहीच्या सर्वोच्च अन् अतिपवित्र मंदिरात प्रवेश करत असेल तर ती मात्र दुर्देवाची बाब ठरेल. ती धोक्याची घंटा म्हणावी लागेल. देशातील प्रत्येकाला काळजी आहे ती याच बाबीची! संघाचा इतिहास हा लोकशाहीला काळिमा आहे अन् त्याचमुळे संघ स्वयंसेवकाचे राष्ट्रपती भवनात जाणे अस्पृश्य ठरणारे आहे.