विरोध झुगारून नागरीक उतरले शहरात रस्त्यावर
भुसावळ शहरात सुवर्ण बाजाराची चमक दुसर्या वर्षीही ‘फिकीच’ : वाढत्या गर्दीमुळे कोरोनाच्या फैलावाची भीती
भुसावळ : जिल्ह्यासह राज्यात सातत्याने वाढणार्या कोरोना रुग्णांमुळे गतवर्षीदेखील लॉकडाऊन काळात आलेल्या अक्षय तृतीया सणावेळी शहरातील सुवर्ण बाजारबंद बंद ठेवण्यात आली तर यंदादेखील तीच परीस्थिती असल्याने ग्राहकांचा यंदा काहीसा हिरमोड झाला आहे. कोरोना निर्बंधामुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने सलग दुसर्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण व्यवसाय ठप्प झाला असून लाखोंची यानिमित्ताने होणार्या उलाढालीला ब्रेक लागला तर प्रशासकीय निर्बंधामुळे मार्केट बंद असल्याने इलेक्ट्रॉनिक्ससह अन्य व्यावसायीकांना मोठा फटका सोसावा लागला. दरम्यान, असे असलेतरी 24 तासांच्या अंतराने लॉकडाऊन जाहीर होणार असल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरीक विरोध झुगारून बाहेर पडल्याचे शहरात मंगळवारी चित्र होते त्यामुळे नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होवून कोरोनाचा फैलाव होण्याची भीतीदेखील वाढली.
दुसर्यांदा हुकला मुहूर्त
कोरोनामुळे सहा दिवसांपासून सुवर्णपेढ्या बंद आहेत. गुढीपाडव्यालाही त्या नियमांमुळे बंद ठेवाव्या लागल्या. सोने खरेदीसाठी विजयादशमी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा व अक्षयतृतीया या सणांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. त्यात मराठी नववर्षाची सुरुवात असल्याने या मुहूर्तावर बहुतांश ग्राहक सोने-चांदी खरेदी करतात. यातून मोठी उलाढाल होते. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोना संसर्गामुळे विविध व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यात आता सलग दुसर्या वर्षी गुढीपाडव्याला सुवर्ण खरेदीचा मुहूर्त हुकत आहे. याची व्यावसायीकांनाही झळ सहन करावी लागत असून या ठिकाणी काम करणार्या मजूर, कारागीर यांच्यावरही परिणाम होत आहे. गेल्या वर्षभरात अनेक दिवस सुवर्णबाजार बंद राहिल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत.
खंत मात्र ग्राहक कोरोनामुक्त हवा : नाना विसपुते
आम्ही सुवर्ण व्यापारी शासनासोबत आहोत, सरकारच्या निर्णयामुळे व्यवसाय ठप्प झाला असलातरी त्याला पर्याय नाही. ग्राहक हा देवता तो कोरोनामुक्त व्हायला हवा ही आमची प्रार्थना आहे. व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा सलग दुसर्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण पेढ्या बंद राहत असल्याची खंत वाटल्याचे भुसावळ सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव विसपुते म्हणाले.
लॉकडाऊनच्या भीतीने नागरीक उतरले रस्त्यावर
मंगळवारी गुढीपाडवा सण असलातरी प्रशासकीय निर्बंधामुळे मार्केट बंदच ठेवण्यात आले होते मात्र गोड-धोड पदार्थांसह हार, फुले, कंगण खरेदीसाठी भल्या सकाळीच नागरीक बाहेर पडले होते त्या शिवाय 24 तासानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे कुटुंबाची गैरसोय टाळण्यासाठी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत गर्दी वाढली होती शिवाय अनेक ठिकाणी नियमांना तिलांजली देण्यात आल्याचे चित्र होते.