विलंब शुल्काविनाच 300 रॅक अनलोडिंगचा विक्रम

0

दीपनगर केंद्राची कामगिरी ; ट्यूब लिकेज न होताच वर्षभर चालला संच क्रमांक पाच

भुसावळ- दीपनगर औष्णिक केंद्राने नवीन विक्रमाची नोंद करीत तब्बल 300 रॅक विलंब शुल्क लागू न करता अनलोडींग केल्या तर संच क्रमांक पाच अखंडपणे ट्यूब लिकेज न होवू देता सुरू ठेवल्याने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक होत आहे. सोमवार, 8 डिसेंबर रोजी आठ तासांत 165 वॅगन्स म्हणजेच 11 हजार 220 टन कोळसा अनलोडींग झाला होता यापूर्वी केंद्रात 151 वॅगन्स कोळसा अनलोडिंगचा विक्रम होता. महानिर्मितीच्या पाच कलमी कार्यक्रमानुसार या कामगिरीमुळे कोळसा अनलोडिंगला विलंब झाल्यास रेल्वेकडून आकारले जाणारे विलंब शुल्क वाचले. परीणामी दीपनगर केंद्रातून निर्माण होणार्‍या विजेचे मूल्य स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. दीपनगर औष्णिक केंद्रात इंधनासाठी वापरल्या जाणार्‍या कोळशाची मोठ्या प्रमाणात गरज असते. ही गरज लक्षात घेवून कोल विभागात रेल्वेच्या माध्यमातून आलेला कोळसा कमी वेळेत अनलोडींग (वॅगन्स खाली करणे) करावा लागतो. या प्रक्रियेत दिरंगाई झाल्यास महानिर्मितीला रेल्वेला विलंब शुल्क भरावे लागते. मात्र महानिर्मितीने सध्या पाच कलमी उपक्रम हाती घेतला असून त्यात विलंब शुल्क कमी करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, मुख्य अभियंता पंकज सपाटे, उप मुख्य अभियंता नितीन पुणेकर, नंदकिशोर देशमुख, अधीक्षक अभियंता मधुकर पेटकर, मदन अहीरकर यांनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले आहे.