विधान परिषदेवरील अकरा जागांसाठीची उमेदवारी डावलली
कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेससह, भाजपवर नाराजी
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे आणि सव्वा वर्षापूर्वी भाजपचे कार्यकर्ते बनलेले आझम पानसरे यांची विधानपरिषद आमदार होण्याची संधी हुकली आहे. कारण विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. यासाठी 16 जुलैला निवडणूक होणार आहे. नेत्यांनी दोघांनाही उमेदवारीचा शब्द दिला असे बोलले जात असल्याने महिनाभरापासून त्यांची नावे चर्चेत होते. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, संधी न मिळाल्याने कार्यकर्ते राष्ट्रवादीसह भाजपवर नाराज झाले आहेत. भाजपा सत्तेवर असल्याने पानसरे यांच्या पुनर्वसनाची शक्यता अधिक आहे; परंतु लांडे यांचा विजनवास निवडणुकीपर्यंत संपण्याची शक्यता मावळलेली दिसत असून यापुढे ते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.
पुनर्वसनाचा लांडेना होता शब्द
जून महिन्यात लांडे यांचा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा झाला होता. त्यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी स्वत: पुढाकार घेऊन सोहळ्याला जंगी स्वरुप आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्यावेळी साने यांच्यासह लांडे समर्थकांनी लांडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी, अशी मागणी केली होती. तसेच प्रदेशाध्यक्षांनी ‘विलास लांडे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होईल’ अशी घोषणा केली होती. त्यापूर्वी लांडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून लॉबिंग केले होते.
संधी गेल्याने नाराजी
भोसरी विधानसभा मतदार संघांचे ते प्रथम आमदार होते. त्यापूर्वी ते विधानपरिषद सदस्य होते. या दोन्ही वेळा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. मात्र, मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचा आमदार महेश लांडगे यांच्याकडून पराभव झाला होता. यानंतर ते विजनवासात गेले होते. तत्पूर्वी ते ‘भाजप’मध्ये जाण्याच्या विचारात होते. मुळचे आमदार लक्ष्मण जगताप भाजपात गेले तरीही त्यांच्याशी लांडे यांचे मधूर संबध होते. त्याचमुळे त्यांची पाऊले दुसरीकडे पडू नयेत यासाठी त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशी खात्री कार्यकर्त्यांना होती. तसेच वाढदिवसालाही शब्द दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत आनंद पसरला होता. परंतू, एकमेव संधी गेल्याने सर्वजण नाराज झाले आहेत.
लांडें यांची खंत
मात्र , बुधवारी पक्षाच्या वतीने विधान परिषदेसाठी परभणीचे बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नेत्यांनी शब्द न पाळल्याची खंत लांडे समर्थकांनी ‘दैनिक जनशक्ति’शी बोलताना व्यक्त केली. पक्षाच्या या भूमिकेतमुळे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
पानसरेंसाठी प्रयत्न पडले अपुरे
भाजपाच्या केंद्रीय समितीकडून बुधवारी दुपारी विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आझम पानसरे यांचे नाव असेल अशी अपेक्षा होती. त्यांच्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप , आमदार महेश लांडगे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या संदर्भात दोन्हीही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोनवेळा भेट घेऊन गळ घातली होती. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सहमती दर्शवली होती. मात्र केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीत एकमत न झाल्याने पानसरे यांचे नाव मागे पडले. त्यामुळे स्थानिक व प्रदेश नेत्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याचे स्पष्ट झाले.
महामंडळ मिळेल अशी चर्चा
आता पावसाळी अधिवेशन संपल्यावर महत्वाच्या महामंडळावर नियुक्त्या आणि मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यावेळी पानसरे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या एखाद्या महामंडळावर नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार असल्याचे पक्ष वर्तुळात बोलले जात आहे. परंतु, पक्षाच्या भूमिकेमुळे पानसरे समर्थकांमध्येही नाराजी दिसत असून त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.