विलास लांडे यांच्या डोक्यात शिजतेय तरी काय?

0

पिंपरी (बापू जगदाळे) : सध्या शहरात समाविष्ट गावाच्या निधी वाटपावरुन सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तसेच भोसरी मतदार संघातील सर्वाधिक भाग या समाविष्ट गावातील आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे प्रथम आमदार म्हणून विलास लांडे यांनी स्वत:हून आपण त्यावेळी किती निधी खर्च केला हे सांगणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्या मौनव्रतामुळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे यांना विरोधकांना उत्तर द्यावे लागले. लांडे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना का उत्तर दिले नाही? अजूनही लांडे व जगताप यांची मैत्री अबाधित आहे? असेल तर ती पक्षाच्या ध्येय धोरणास व तत्वास बाधक आहे का? असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने पुढे येत आहेत. शहरातील राजकारणात चाणाक्ष समजले जाणारे विलास लांडे यांच्या डोक्यात नेमके शिजतेय तरी काय? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात पडला आहे.

निधी वाटपावर गप्प का?
जगताप व लांडे यांची मैत्री राष्ट्रवादीत असल्यापासून शहराला परिचित आहे. याचा प्रत्यय राष्ट्र्वादीत जगताप असताना देखील गटातटाच्या राजकारणावेळी येत असे. जेव्हा जगताप यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला, तेव्हा आपल्या या मित्राला देखील प्रवेशासाठी खूप विनवणी केली होती. पण लांडे यांचे शरद पवार प्रेम आडवे आले आणि त्यांनी पुन्हा घड्याळालाच साथ दिली. वास्तविक अनेकांनी त्यांना भाजपात जाण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी तो न स्वीकरता पुन्हा एकदा लोकसभे सारखाच धोका पत्करला. त्यांनी त्या वेळेसच भाजपची वाट धरली असती तर त्यांचे आजचे चित्र वेगळे असले असते, असे त्यांच्या गटाचे मत आहे. विधानसभेला भोसरीतून महेश लांडगे हे सर्व पक्षीय (राष्ट्रवादी सहित) कार्यकर्त्याच्या कष्टावर अपक्ष म्हणून निवडून आले. पालिका निवडणुकी अगोदर जगताप यांचे पुन्हा लांडे यांना बाजपा मध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न चालूच होते . पण त्यालाही लांडे यांनी प्रतिसाद दिला नाही. यातून त्यांनी काय मिळवले हे त्यांनी अद्यापही आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले नाही.

लांडे उत्तर का देत नाहीत?
विधानसभेच्या निवडणुकीत जरी लांडे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पालिकेवरची पंधरा वर्षांची अबाधित सत्ता संपुष्टात आली असली तरी लांडे यांनी आपल्या मतदार संघात राष्ट्रवादीचे निम्म्याच्या आसपास नगरसेवक निवडून आणून दाखवत आपली राजकीय ताकद जिवंत असल्याचा संदेश विरोधकांना दिला आहे. हे झाले त्यांच्या वर्तमान राजकीय ताकदीविषयी. पण दीड वर्षावर विधानसभेच्या निवडणुका आल्या असताना देखील लांडे मोठया कार्यक्रमात दिसत नसले किंवा पालिकेच्या राजकारणात सहभागी होताना दिसत नसले तरी मतदार संघातील अनेक भागात नेहमीच दिसतात. यामुळे त्यांचा नेमका गनिमी कावा अद्यापही लक्षात आलेला नाही.

तत्कालीन आमदार म्हणून त्यांचीच जबाबदारी
त्यामुळेच समाविष्ट गावात लांडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून व आपली पत्नी महापौर असताना रस्ते,पाणी व ईतर मुलभुत सुविधा साठी हजारो कोटी निधी उपलब्ध करून दिला. असे असताना आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीने समाविष्ट गावावर नेहमीच अन्याय केला असा आरोप केला होता. हा आरोप पहिला असता या पूर्वीचे पुढारी कोण? असा प्रश्‍न उपस्थित होताना दिसतो. आमदार महेश लांडगे हे आता भाजपच्या तंबूत आहेत. मग जगतापांचा रोख कुणाकडे होता असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. लांडे व जगताप यांची मैत्री अद्यापही टिकून आहे की नाही आणि असली तरी ती एकतर्फी आहे का? हा देखील विषय लांडे यांच्या समाविष्ट गावाबाबतील गप्पच्या भूमिकेमुळे पुढे येत आहे. जो पर्यंत लांडे काही बोलत नाहीत तो पर्यंत संजोग वाघेरे यांनाच एकाकी पक्षाचा किल्ला लढवावा लागणार हे मात्र नक्की.