विल्हाळेत दंगल ; दगडफेक झाल्याने दोन्ही गटातील पाच जण जखमी

0
पहिल्या गटाच्या पाच तर दुसर्‍या गटाच्या नऊ जणांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ:- तालुक्यातील विल्हाळे येथे मंदिराच्या ओट्यावर चप्पल घालून का बसलास?  या कारणावरून दोन गटात वाद उफाळल्याने दंगल उसळली. दोन्ही गटांनी सर्रास लाठ्या-काठ्यांसह दगडफेक केल्याने दोन्ही गटातील पाचहून अधिक जण जखमी झाले. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर वरणगाव पोलिसांनी गावात जावून शांतता प्रस्थापीत करीत दोन्ही गटातील तीन संशयीतांना अटक केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादीनुसार पहिल्या गटाच्या पाच तर दुसर्‍या गटाच्या नऊ मिळून 14 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिराबाहेर चप्पल घातल्याचा वाद
गावातील पाण्याच्या टाकीजवळील देवीच्या ओट्यावर चप्पल घालून बसल्याने निलेश व दरबार बेलदार यांच्यातील शाब्दीक चकमक विकोपाला गेल्याने तुफान हाणामारी झाली. त्यात सर्रास दगडफेक करण्यात आल्याने गोपाळ बंजरग बेलदार, पंजाब बेलदार, देवचंद बेलदार, मायकल बजरंग जाधव, उषाबाई मांगीलाल जाधव जखमी झाले. या घटनेप्रकरणी निलेश नवलसिंग बेलदार यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मायकल जाधव, गोपाळ बेलदार, बजरंग बेलदार, पंजाब बेलदार, दीपक बेलदार, सुभाष बेलदार यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल  करण्यात आला.
दुसर्‍या गटाच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे शकुंतलाबाई मांगीलाल बेलदार यांनी तक्रार दिली. त्यावरून संशयीत आरोपी निलेश नवल बेलदार, विजय नवल बेलदार, रवींद्र बेलदार, सुनील लहू बेलदार, अनिल लहू बेलदार, गणेश रमेश बेलदार, करण जगन बेलदार, नवल भाऊराव बेलदार, शरद भूरा बेलदार यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दंगलीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून परीस्थिती नियंत्रणात आणली. तपास पोलीस हेड कॉस्टेबल जितेंद्र नारेकर करीत आहेत.