वरणगाव। विल्हाळे सिध्देश्वरनगरकडे जाणार्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी ये-जा करणार्यांना पाण्यातून व खड्ड्यातून कसरत करावी लागत आहे. मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिध्देश्वरनगरमधील गोरगरीब मजूर वर्गाचा रहिवास आहे. या भागाची लोकसंख्या जवळपास 7 हजाराच्यावर आहे. महात्मा गांधी विद्यालयापासून हा एकमेव रस्ता असल्याने विल्हाळे व सिध्देश्वर नगरवासियांचे नैसर्गिक पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे पुलाखाली मोठे खड्डे तयार होवून पाणी साचत आहे.
रेल्वे पुलाखाली साचणार्या पाण्याचा मार्ग मोकळा करावा
ग्रामस्थांना या खड्यामधून रस्ता शोधत मार्गक्रम करावा लागत असतो. तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये शाळकरी विद्यार्थी व महिला रस्ता शोध करीत असतांना छोटेमोठे अपघात दररोज घडत असतात. परिणामी पालिकेकडून काही महिन्यांपूर्वी सिध्देश्वरनगरकडे जाणार्या रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली साचणार्या पाण्याविषयी नगराध्यक्षांसह नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी यांनी पाहणी करून पर्यायी व्यवस्था सिध्देश्वरनगरातील मुतारी जवळून नालीचे खोदकाम करुन पाणी वळून नाल्यात काढण्यात आले होते. मात्र सर्वस्वी विषय निधीअभावी रखडल्याने नागरिकांना अद्याप समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी पालीकेने नागरीकांच्या आरोग्यतून योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे. हा समस्याचा विषय फार पूर्वीचा असून या विषयी नगरपालिका झाल्यावर सुटेल अशी समज नागरीकांमध्ये होती. मात्र पालिका झाल्यावर सुध्दा विषय सुटत नसल्याने नागरीक निराशा पसरली आहे.