पालघर। ओमसाई विळंगी मंडळ आयोजित विळंगी प्रीमिअर लीग कबड्डी स्पर्धेत ओमसाई राजे संघ विजेतेपदाचा मानकरी ठरला. अंतिम फेरीत जेत्या संघाने साईराज संघाचा पराभव केला. उत्कृष्ट चढाई म्हणून ओमकार घरत आणि उत्कृष्ट पकड म्हणून अतुल पाटील व प्रशांत घरत याची निवड करण्यात आली. या स्पर्धेचे चषक संदेश घरत यांनी आपले बंधू रवींद्र घरत यांच्या स्मरणार्थ दिले होते.
या लीग स्पर्धेसाठी विळंगी गावातील सहा संघ तयार करण्यात आले होते. या लीगमधील सामन्यांचे उद्घाटन व बक्षीस समारंभ विळंगीचे शिक्षक राजन घरत यांच्या हस्ते करण्यात आला. या खेळामुळे फक्त मनोरंजनच होत नाही, तर एकीची भावना, संघभावना व वैचारिक एकता मजबूत होते. त्याच सामाजिक संबंध दृढ होऊन शारीरिक, मानसिक विकास होतो. म्हणून ठिकठिकाणी अशा सामन्यांचे आयोजन केले पाहिजे, असे मत राजन घरत यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी पुढील वर्षासाठी निखिल घरत स्मरणार्थ विजयी संघांना चषक जाहीर केले.