रावेर- बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर विवरे खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ भरधाव दोन दुचाकी समोरा-समोर धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मुकेश भाऊराव पाटील (19, रा.विवरे खुर्द) याचा जागीच मृत्यू झाल. याबाबत निंभोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
समोरा-समोर दुचाकी आदळून अपघात
विवरे खुर्द येथील रहिवासी मुकेश भाऊलाल पाटील (19) हा मित्र शुभम पांडुरंग लोखंडे याच्यासह दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.एस. 0586) ने उटखेडा रस्त्यावरून महामार्गावर चढत असतांना रावेरकडून सावद्याकडे जाणारी दुचाकी (एम.एच.19 डी.ए. 3199) मध्ये समोरा-समोर जोरदार धडक झाली. या अपघातात विवरे खुर्द येथील मुकेश भाऊलाल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर शुभम पांडुरंग लोखंडे (विवरे खुर्द) यासह पाल येथील दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. मयत मुकेश पाटील यांच्या मृतदेहाचे रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बारेला यांनी शवविच्छेदन केले. पोलिस पाटील योगेश महाजन यांनी फिर्यादी दिल्यावरून निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अन्वर तडवी करीत आहेत.