विवाहाच्या नावाने फसवणूक प्रकरण : शिर्डीतून बनावट आधारकार्ड बनविणारी महिला जाळ्यात

Fraud case in the name of marriage in Bhusawal: Woman from Shirdi who made fake Aadhaar card in the net भुसावळ : मध्य प्रदेशातील शहापूर येथील योगश महाजन या युवकाकडून एक लाख रुपये घेत त्याच्याशी विवाह करून पळून जाणार्‍या नवरीविरूध्द गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणात शिर्डी येथे 300 रुपयात बनावट आधारकार्ड तयार करून देणार्‍या महिलेस शनिवार, 24 रोजी रात्रीच भुसावळ पोलिसांनी ताब्यात घेत भुसावळात आणले. याप्रकरणी अजून एक जण पसार झाला आहे. अटकेतील महिलेस न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

नवरी पळताना संशय आल्याने बिंग फुटले
मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर जवळील शहापूर येथील रहिवासी योगेश संतोष महाजन हा युवक अविवाहित असून रावेर येथील त्यांचे परीचीत अतुल गुर्जर यांच्याशी त्यांचा परीचय होता. गुर्जर यांच्या माध्यमातून कंडारी, ता.भुसावळ येथे एक मुलगी असून तिच्याशी योगेश याचा विवाह ठरला व तत्काळ न्यायालयात पारही पडला. मात्र यातील नवरी मुलगी हिने घरात शौचालय असतांनाही शौचालयास जाते असे सांगून बाहेर पडत असतांना तिला घरातल्यांनी हटकले असता, ती घरातून पळू लागली सोबत आलेला मावस भाऊ हा सुधदा पळू लागला. मात्र त्यांना पकडल्यावर बिंग फुटले. तिच्या सोबत असलेला तिचा मावस भाऊ हा तिचा खुद्द पतीच होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी या तपासात शिर्डी येथे जाऊन तेथे 300 रुपये घेऊन बनावट आधारकार्ड तयार करून देणार्‍या एका महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शिर्डी कोर्टात नेले रात्री
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सुपडापाटील व भूषण चौधरी तसेच महिला पोलिस कर्मचारी हे गेले होते. त्यांनी तेथून मंगल अशोक पठारे (रा. साकुरी वाणी वस्ती राहता, जि.नगर) यामहिलेस ताब्यात घेत शिर्डी न्यायालयात रात्री नेत न्यायालयाच्या परवानगीने महिलेस अटक केली. रविवारी भुसावळ येथे आणून येथील न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणी शिर्डी येथून एक जण पसार झाला आहे.

आधारकार्ड बनविणारी टोळी कार्यरत
याप्रकरणात पोलिसांनी नवरी मुलगी जया पाटील, सुनील पाटील, आशाबाई ठाकरे (रा. कंडारी) व आता शिर्डी येथून मंगल पठारे या महिलेस अटक केली आहे. पठारे या महिलेची बनावट आधारकार्ड तयार करून देणारी गँग आहे, 300 रुपये घेत ही महिला कोणाच्याही नावाने आधारकार्ड तयार करून देते, असे डीवायएसपी वाघचौरे यांनी सांगितले. याप्रकरणात अजून कोण कोण अडकते याकडे लक्ष लागले आहे.