विवाहानंतर भुसावळात वर-पित्याचा मृत्यू ; तळवेल गावावर शोककळा

0

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय

भुसावळ– शहरातील रामानंद पॅलेसमध्ये आयोजित विवाह सोहळ्यात वर-पित्याचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. गोपाल खंडू राणे (70, मूळ रा.तळवेल व हल्ली मुक्काम कोंडवा खुर्द, पुणे) असे मृत वर-पित्याचे नाव आहे. या घटनेने तळवेल गावावर शोककळा पसरली. भुसावळातील बद्री प्लॉटमधील रहिवासी व इंदौर येथे सेल्स टॅक्स अधिकारी असलेल्या सुनील झोपे यांची एकुलती एक कन्या अश्‍विताचा पुण्यातील रहिवासी गोपाळ राणे यांचा एकुलता एक मुलगा व पुण्यातील खाजगी कंपनीत मॅकेनिकल इंजिनिअर असलेल्या प्रशांतशी सोमवारी जळगाव रोडवरील रामानंद पॅलेसमध्ये धुमधडाक्यात विवाह झाला. एकुलत्या एक मुलाच्या लग्नानिमित्त वर-पिता गोपाळ राणे यांनी मिरवणुकीत नाचून वर्‍हाडींचा उत्साह वाढवला. तब्बल अडीच तासांपर्यंत ते तप्त उन्हात मिरवणुकीत ते नाचल्यानंतर लग्न मंडपात परतले. काही वेळात विवाह लागल्यानंतर त्यांना अवस्थ वाटू लागल्याने त्यांनी पाणी प्यायल्यानंतर त्यांना उलटी झाली. यानंतर त्यांना लागलीच गावातील डॉ.जयंत धांडे यांच्याकडे हलवल्यानंतर त्यांना जळगाव येथील इंडो अमेरीकन रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनह मृत घोषित केले. राणे यांच्या मृत्यूनंतर तळवेल गावावर शोककळा पसरली.