दोंडाईचा। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावात शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी तिच्या पतीला तिघांनी काठीने मारहाण केली. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीत चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ले येथील 25 वर्षीय विवाहितेस गावातील देवमन सोनू मालचे हा शिवीगाळ करीत होता. त्यास शिवीगाळ का करतात, असा तिने जाब विचारल्याचा राग येऊन देवमन मालचे याने विवाहितेचा हात धरुन तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत ती पतीस सांगत असतांना देवमन मालचे, नाना दौलत सोनवणे, सुशील साहेबराव पवार या तिघांनी त्यास काठीने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पीडित विवाहितेने दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्पर विरोधी फिर्यादीत देवमन सोन्या भील (24) यांनी म्हटले आहे की, दि.24 रोजी सकाळी 10.30 वाजता कर्ले गावात भैय्या श्रावण भील याने देवमन भील यास दारूच्या नशेत शिवीगाळ केली. याबाबत देवमन भील याने शिवीगाळ का करतो? असा जाब विचारल्याचा राग येऊन भैय्या भील याने देवमन यास शिवीगाळ करुन कुर्हाडीच्या दांड्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करुन जखमी केले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार भैय्या भीलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील भांडणावरुन वृध्दास मारहाण
धुळे : धुळे तालुक्यातील सरवड गावातील रहिवासी युवराज शेनपडू पाटील (60) यांना दि.24 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सरवड गावाबाहेरील दर्गाहजवळ मागील भांडणाची कुरापत काढून संदीप संतोष पाटील याने हाताबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ केली तसेच राजेंद्र लक्ष्मण पाटील याने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठयास चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी युवराज पाटील यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरुध्द भादंवि कलम 324, 323, 504, 506,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकर्याची फसवणूक
साक्री । साक्री तालुक्यातील कालंदर पैकी विश्राम नगरातील रहिवासी युवराज गरजू गायकवाड (48) या शेतकर्याने सन 2013 पासून भास्कर दगा पाटील यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याबदल्यात भास्कर पाटील याने युवराज गायकवाड यांना दमदाटी करुन त्यांच्या संमतीशिवाय शेतावर व्याजाच्या पैशांच्या बदल्यात कब्जा करुन फसवणूक केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गायकवाड यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भास्कर पाटील विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन तरुणीला पळविले
शिरपूर । शिरपूर शहरातील अंबिका नगरातील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि.21 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात तरुणीचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.