निगडी : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिखली येथे मंगळवारी (दि. 11) घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. उर्मिला इंदर कांबळे (वय 20, रा. जाधव चाळ, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या करणार्या महिलेचे नाव आहे. उर्मिला आणि इंदर भरत कांबळे (वय 24) यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंदरचे दुसर्या स्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचा उर्मिलाला संशय होता. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. इंदरने उर्मिलाला अनेकदा शिवीगाळ आणि मारहाणही केली होती. याच नैराशातून उर्मिलाने मंगळवारी राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उर्मिलाच्या वडिलांनी या प्रकरणी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंदरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.