जामनेर (प्रतिनिधी)- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामनेर येथील सासरकडील संशयित सहा जणांवर दोंडाईचा पोलीस स्टेशनला कलम ३०६, ३०४/बी,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, दोंडाईचा येथे मालपूर रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणारे फिर्यादी नितीन शेम्पा भोई यांची बहीण वैशाली हिने दि.३ रोजी रात्री ९.३० वाजता भाऊ नितिन भोई यांच्या घराच्या समोर असलेल्या पत्र्याच्या घरात लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेतल्याने ती मरण पावली. वैशाली हिचा अंत्यसंस्कार केल्यानंतर दि.६ फेब्रुवारी रोजी घरी सामान आवरत असताना तिच्या दवाखान्याच्या फाइलमध्ये तिच्या हस्ताक्षरातील चिट्ठी मिळून आली. या चिठ्ठीत तिने सासरकडील लोकांकडून झालेला त्रासाबाबत लिहून ठेवलेले आहे. ही चिट्ठी फिर्यादसोबत जोडण्यात आली आहे. दि.२३ नोव्हेंबर २०१९ ते दि.३ फेब्रुवारी २०२१ रोजीचे दरम्यान लग्नात मान सन्मान दिला नाही. तसेच दहा लाख रुपये दिले नाही, या कारणावरून पती तसेच धनराळे क्लासेसचे संचालक योगेश किसन धनराळे, सासरे किसन ताराचंद धनराळे, सासू सुशिलाबाई किसन धनराळे, नणंद प्रीती अंकुर मोरे, नंदोई अंकुर भिकाजी मोरे, ननंद पिंकी किसन धनराळे (सर्व रा. आयटीआय कॉलनी जामनेर) यांनी बहिण वैशालीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले अशी तक्रार नितीन शेम्पा भोई यांनी दिली असुन सासरच्या मंडळींविरूध्द दोंडाईचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.